मन, बुद्धीच्या पोषणासाठी वाचन आवश्यक डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

पुणे : “पुस्तके माणसाला घडविण्याचे काम करतात. शरीराच्या पोषणासाठी अन्न जसे महत्वाचे, तसेच मनाच्या व बुद्धीच्या पोषणासाठी वाचन आवश्यक असते. एकसष्टीच्या निमित्ताने ग्रंथतुला करून ज्ञानाचे भांडार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट आणि भरत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त बाळासाहेब दाभेकर यांच्या एकसष्ठी निमित्त ग्रंथतुला, धान्यतुला, जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सदानंद मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप, पृथ्वीराज सुतार, डॉ. रोहित टिळक, संजय बालगुडे, ॲड. मंदार जोशी, दत्ता सागरे, रुपाली पाटील ठोंबरे, मुकारी अलगुडे, गोपाळ चिंतल, बाळासाहेब बोडके, अंकित अगरवाल, अजित दरेकर, निरंजन दाभेकर आदी उपस्थित होते.

यावेळी आचार्य आनंद ऋषी रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ७५ बाटल्यांचे संकलन झाले. प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. गरीब व गरजू महिलांना साड्या व चपला वाटप करण्यात आले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “बाळासाहेब दाभेकर यांचा लोकसंग्रह, सर्वपक्षीय प्रेम आणि ग्रंथतुला झालेली पाहून आनंद वाटला. आयुष्यभर समाज कार्याला वाहून घेतलेल्या दाभेकरांच्या एकसष्टीनिमित्त रक्तदान शिबीर, गरजूंना अन्नधान्य, कपड्यांचे आणि पुस्तकांचे वाटप ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या हातून यापुढेही असेच विधायक काम होत राहो. लोकांच्या आयुष्यात आनंद पेरत पंच्याहत्तरी आणि शताब्दी साजरी करावी, अशा शुभेच्छा देतो.”

उल्हास पवार म्हणाले, “राजकारण व समाजकारण याची सांगड घालून वंचित, दुखी आणि गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचे काम बाळासाहेब दाभेकर यांनी केले आहे. जीवनातला सर्वाधिक वेळ त्यांनी समाजासाठी देताहेत. निरपेक्षपणे सर्वांवर प्रेम करत सर्वांसाठी काम करणाऱ्या दाभेकर यांना ‘सार्वजनिक अण्णा’च म्हटले पाहिजे. भरत मित्र मंडळ, शिवरात्र महोत्सवातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम उभारले आहे.”

श्रीरंग बारणे म्हणाले, “साठीनंतरही दाभेकरांचा उत्साह वाखण्याजोगा आहे. लोकसंग्रह कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकलो. सर्वच वयोगटातील लोकांना आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आजवर एकही वाढदिवस न चुकवता त्यांना शुभेच्छा द्यायला आल्याशिवाय राहत नाही. दाभेकरानी आजवर अनेकांना घडवले; उभे केले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो.”

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “राजकारणातील एखादे पद न मिळवताही चांगले काम करता येते, हे दाभेकरानी दाखवून दिले आहे. पक्ष आणि जातीच्या पलीकडे जात त्यांनी लोकांची सेवा केली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. समाजसेवेचे हे व्रत असेच अखंडित चालू राहावे.”

Leave a Reply

%d bloggers like this: