नवीन शिक्षण धोरण गुणवत्ता केंद्रित : प्रा. के. के. अगरवाल

पुणे : “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने नवीन शिक्षण धोरणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींचा अभ्यास करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली, तर गुणवान युवापिढी घडेल. आपल्या देशात ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील विद्यार्थी असतात. या सगळ्यांच्या केंद्रित करून गुणवत्ता वाढ कशी होईल, यावर विचारमंथन व्हावे,” असे प्रतिपादन नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिएशनचे चेअरमन प्रा. के. के. अगरवाल यांनी केले.

पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (सीईजीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण व गुणवत्ता वाढ’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रसंगी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) संचालक लेफ्टनंट कर्नल कैलास बन्सल, ‘सीईजीआर’चे राष्ट्रीय अध्यक्ष व शोबित विद्यापीठाचे कुलपती कुंवर शेखर विजेंद्र, सर पद्मपंत सिंघानिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीहरी, सेज विद्यापीठ भोपाळचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. के. जैन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व सीईजीआर’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, आयआयएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विकास सिंग, एक्झिम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे महाव्यवस्थापक प्रा. के. पी. इसाक, ‘सूर्यदत्ता’चे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते.

प्रा. के. के. अगरवाल म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीतही बदल व्हावेत. क्रियाशीलता, शिकण्याची उर्मी त्यांच्यात यावी. प्रत्येक शिक्षणसंस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यामुळे भौगोलिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व बाजूंचा विचार करून, योग्य त्या पायाभूत सुविधा उभारायला हव्यात. नवी आव्हाने समजून घेत शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी. रोजगार आणि कौशल्याभिमुख शिक्षणाला प्राधान्य द्यावे.”

कैलास बन्सल म्हणाले, “शिक्षण व्यवस्थेत अनेक सुधारणा होत आहेत. प्रगत शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगाने विकास होईल. त्यांच्यातील कलात्मकतेला, नावीन्यतेला आणि क्रियाशीलतेला चालना देण्यासाठी विविध नवोपक्रम राबविण्यात येत आहेत. नव्या शिक्षण धोरणानुसार पायाभूत सुविधांच्या उभारणीवर आपण भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला अनुकूल वातावरण तयार व्हावे. त्यासाठी सर्व शिक्षणसंस्थांचा पुढाकार महत्वाचा राहणार आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अभिनव शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे आहे. औद्योगिक आणि शिक्षण संस्थांतील परस्पर संवाद नव्या संधी निर्माण होण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे हा संवाद वाढला पाहिजे. नवीन शिक्षण धोरणातील तरतुदी समजून घेत शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे. राष्ट्राच्या, समाजाच्या विकासात योगदान देणारी युवा पिढी घडवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. त्यासाठी संशोधन, इनोव्हेशन आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांवर भर दिला पाहिजे. नवे धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करणारे ठरेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: