Mumbai – पावसाची दमदार हजेरी, हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मागील काही तासांपासून मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत बहुतांश भागांत रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना या पाण्यातून रस्ता काढणे अवघड झाले आहे. १३ आणि १४ जूनलाही मुंबईत मुसळधार पावसामुळे हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हवामान खात्याने मुंबई व आसपासच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात १३ जूनपासून मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आयएमडीने सांगितले की, मुंबई व शेजारील ठाण्यातील काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज, म्हणजेच शनिवारी असाच इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २४ तासांत २०४.५५ मिमी पेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टीचा पाऊस मानला जातो.

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने एनडीआरएफच्या १५ तुकट्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी ट्विट केले, की रत्नागिरी येथे ४ विविध दलाच्या ४ तुकड्या तर मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाण्यात प्रत्येकी दोन आणि कुर्ल्यात १ तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: