पर्यावरणदिनी पारंपरिक पद्धतीने झाडांचा वाढदिवस साजरा – आधार सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

पुणे :  झाडे लावा, झाडे जगवा अशा केवळ घोषणा न देता प्रत्यक्षपणे वृक्षारोपण करुन ती झाडे जगवित दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आधार सोशल फाऊंडेशनतर्फे केला जात आहे. यावर्षी देखील फुलांच्या माळा, रंगावली अशी सजावट करीत औक्षण करुन पारंपरिक पद्धतीने झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक गणेश मंडळ आपापल्या भागात वृक्षारोपण करुन झाडांचे संगोपन करतील, असा संकल्प देखील करण्यात आला. 

आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहराच्या मध्यवस्तीमध्ये गेल्या ८ वर्षांपूर्वी लावलेल्या आणि वाढविलेल्या सुमारे ८० झाडांचा वाढदिवस थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान चौकात साजरा करण्यात आला. खासदार गिरीष बापट, आमदार सुनील कांबळे, भाजपा पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, मुख्य आयोजक माजी नगरसेवक व आधार सोशल फाऊंडेशनचे संस्थापक दिलीप काळोखे, प्रसाद जोशी, अनिल काळोखे, सविता काळोखे, गणेश येनपुरे, राहुल हांडे, पूरन हुडके, अनिल पवार, राजेश शिंदे, यश शिंदे, राजू आखाडे आदी उपस्थित होते. थोरले बाजारीव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ व शाळांच्या परिसरात सर्व झाडे लावलेली आहे. 
थोरले बाजीराव रस्ता परिसरातील झाडांना फुगे लावण्यात आले आणि  फुलांनी सजविण्यात आले. तसेच झाडांभोवती रांगोळी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. तसेच वड, पिंपळ, कडूलिंब आदी देशी झाडांचे पारंपरिक पद्धतीने पूजन देखील झाले. कार्यक्रमात अंबिकामाता भजनी मंडळ, राम दहाड, प्रकाश ढगे  या पर्यावरण रक्षकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला.  

सुनील कांबळे म्हणाले, झाडे लावण्यापेक्षा त्या झाडांचे संवर्धन करुन ती जगविणे महत्वाचे आहे. आधार सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे झाडांचे संगोपन करीत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे. राजेश पांडे म्हणाले, पर्यावरण दिन हा आॅक्सिजन देणा-या वृक्षांचा दिवस आहे. समाजाप्रती आपले असलेले नाते हे वृक्षारोपणातून आपण दृढ करायला हवे. 
श्रीपाद ढेकणे म्हणाले, गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने मोठया स्वरुपात वृक्षारोपण करणे शक्य आहे. तसेच शहराच्या विविध भागात झाडांविषयी जनजागृती होण्यास मदत होणार आहे. दिलीप काळोखे म्हणाले, सुमारे १५ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण विविध भागांत १०० झाडे लावणार आहोत. तसेच पुढील वर्षी सर्व झाडांचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत. जी झाडे आॅक्सिजन देतात, त्यांचे पूजन करणे आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. मंदार रांजेकर यांनी सूत्रसंचालन केले.

झाडांचा वाढदिवस करण्याकरीता व वृक्षसंवर्धनात सहभागी गणेश मंडळे
नवदीप मित्र मंडळ, लोकमान्य टिळक प्रथम स्थापित गणपती ट्रस्ट (विंचूरकर वाडा, दिग्वीजय मित्र मंडळ, लाकडी गणपती मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ, वनराज मित्र मंडळ, तक्षशिला बुद्ध विहार व शिवराज मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ व अभियान प्रतिष्ठान, स्वारगेट पोलीस वसाहत, सनी क्रिकेट ११ यांसह अनेक मंडळे व संस्था झाडांचा वाढदिवस करण्यासोबतच वृक्षसंवर्धनात सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: