अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून अम्युझमेंट पार्क इंडस्ट्रीला वाचवा – पंतप्रधानांकडे मागणी
पुणे : भारताच्या सेवा क्षेत्रातील मनोरंजन उद्योगात ४० टक्के योगदान असलेल्या अम्युझमेंट व थीम पार्क व्यवसायाला कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला आलेल्या अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून वाचवण्यासाठी मदतीचा हात द्या, अशी मागणी द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात आयएएपीआय या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे शहराचे रहिवासी असलेले संस्थेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या व्यवसायाची सध्याच्या परिस्थिती, येणा-या अडचणी यांची माहिती देत त्यांच्याकडून मदत मागितली आहे.
याविषयी बोलताना राजीव जालनापूरकर म्हणाले, मनोरंजन उद्योग हा भारतीय पर्यटन उद्योगाचा अविभाज्य घटक असून भारतात तो सध्या बाल्यावस्थेत आहे. मात्र असे असले तरीही अम्युझमेंट पार्क्सला भेट देणा-यांपैकी ३०-३५% पर्यटक हे बाहेरून आलेले पर्यटक असल्याने याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याबरोबरच पर्यटन व्यवसायाला सुद्धा होतो. भारताचा विचार केल्यास राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी सुमारे ३ कोटी पर्यटक हे अम्युझमेंट व थीम पार्क्सला भेटी देतात. याची एकूण वार्षिक उलाढाल ही १७ अब्ज रुपये (१७ बिलियन) व वार्षिक वाढीचा दर हा १७.५% इतका आहे. शिवाय किमान ७५ हजार नागरिकांना या उद्योगामधून थेट रोजगार उपलब्ध होतो तर अप्रत्यक्ष रित्या सुमारे अडीच लाख व्यक्तींना रोजगार मिळण्यास मदत होते.
सध्याच्या कोरोन काळात इतर उद्योगांप्रमाणेच अम्युझमेंट व थीम पार्क उद्योगाला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षात बरेच महिने सर्व अम्युझमेंट व थीम पार्क बंद होते. त्यामुळे सध्या कर्मचा-यांचे वेतन देणे, जीएसटी, अॅडव्हान्स टॅक्स, पीएफ, ईएसआय, राज्यांचे कर, व्याजाचे हप्ते भरणे आदी बाबी पूर्ण करणे अशक्य झाले आहे. या आर्थिक संकटांसोबतच दिवाळखोरी, व्यवसाय कायमचे बंद करणे व कामगारांना मोठ्या प्रमाणात नोकरीवरून काढून टाकणे यांसारख्या समस्या देखील उभ्या ठाकल्या असल्याचे, जालनापूरकर यांनी सांगितले. एका अंदाजानुसार या क्षेत्राला कोरोना काळात सुमारे 90 हजार कोटींचा तोटा झाला आहे.
