पीएमपीच्या भव्य रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
४२४९ रक्तदात्यांनी रक्तदान करून केली विक्रमी रक्तदानाची नोंद
पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता व महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो ही बाब विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकी व सेवाभावीवृत्तीने दि. २९ मे २०२१ रोजी एकाच दिवशी एकाच वेळी १५ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ७१९५ रक्तदाते उपस्थित होते त्यापैकी ४२४९ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले तर हिमोग्लोबिन, बी.पी. इ. वैद्यकीय कारणास्तव २९४६ रक्तदाते प्रत्यक्ष रक्तदान करू शकले नाहीत.
पुणे शहराची रक्तवाहिनी म्हणून ओळख असलेल्या पीएमपीएमएलने ४२४९ इतके बॅगचे विक्रमी रक्तसंकलन करून पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात उच्चांकी रक्तदानाची नोंद करून पीएमपीएमएलने पुणे व पिंपरी चिंचवड शहराचा रक्तदाता अशी नवी ओळख निर्माण केली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासियांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
या रक्तदान शिबिरात पीएमपीएमएलचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक व मित्रमंडळी यांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या भव्य रक्तदान शिबिराची तांत्रिक बाजू “रक्ताचे नाते ट्रस्ट” सांभाळणार असून या ट्रस्टचे राम बांगड व ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांचे विशेष सहकार्य लाभले. या भव्य रक्तदान शिबिराची संकल्पना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी मांडली व ही संकल्पना सिद्धीस नेण्यासाठी सहव्यावस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, सर्व विभाग प्रमुख, सर्व डेपो मॅनेजर, सर्व डेपो मेंटेनन्स इंजिनीअर यांचेसह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन करून हे भव्य रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी समर्पण वृत्तीने अपार मेहनत घेतली.
