बुद्ध जयंती निमित्त गरजूंना धान्यवाटप
पुणे – भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जाहिरात आणि फलक या अनावश्यक खर्चाला फाटा देत, या रकमेतून गरीब रिक्षाचालक व घरेलू कामगार महिलांना धान्य व दैनंदिन वस्तूंचे वाटप भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने व कॅटलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने आज करण्यात आले.
यावेळी कॅटलिस्ट फाउंडेशनच्या सचिव लक्ष्मीकांता माने, भाजप प्रभाग २९ च्या महिला अध्यक्षा दिव्या लोळगे, समीर भुते, मिलिंद मोरे, माधुरी नंदी, अरुण बागडी,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, कोरोनामुळे १४ एप्रिल पासून राज्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तु वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. अशावेळी रोजगार बंद असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षाचालक व घरेलू कामगारांची ससेहोलपट होत आहे. या काळात राज्य शासनाने त्यांना देऊ केलेली मदत तुटपुंजी ठरत आहे. या संकटाच्या काळात सर्व सामान्य जनतेच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे. म्हणूनच सर्वसामान्य लोकांना माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आज शहर भाजप व कॅटलिस्ट फाउंडेशनच्या वतीने रिक्षाचालक व घरेलू कामगार यांना धान्य व दैनंदिन वस्तूंचे वाटप केले. या किटमध्ये तीन किलो गहू, पाच किलो तांदूळ,अर्धा किलो तुरडाळ, एक किलो खाद्य तेल, ५० ग्रॅम मिरचिपुड,५० ग्रॅम हळद, एक किलो साखर, अर्धा किलो पोहे, चहापावडर, हरभरा आदी वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ही आम्ही या अनावश्यक खर्चाला फाटा देत ही रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी दिली होती.
