पोलीस नाईक वरपे-पाटील व पोलीस अंमलदार हिलाल यांचा कर्तव्य फाउंडेशनतर्फे सन्मान
पुणे – लष्कर भागातून कार चोरणाऱ्या सराईत चोराला तब्बल एक तास पाठलाग करून अटक केल्याबद्दल लष्कर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक संग्राम वरपे-पाटील व पोलीस अंमलदार वैभव हिलाल यांचा कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व कार्याध्यक्ष अशोक देशमुख यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस मोहसीन शेख ,झहीर शेख,उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
लष्कर भागात १९ मे २०२१ रोजी जयंत साळुंके यांची रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार एका सराईत चोरट्याने पळविली त्यावेळेस लष्कर पोलीस ठाण्यात बीट मार्शलच्या कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक संग्राम वरपे-पाटील व पोलीस अंमलदार वैभव हिलाल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनानुसार जी.पी.आर.एस.यंत्रणेचा आधार घेत सदर कारचा दुचाकीवरून सोलापूर बाजार, वानवडी बाजार, फातिमानगर, लुल्लानगर,कोंढवा, कमांड हाॅस्पिटल असा पाठलाग केला,दरम्यान चोरट्यांनी दोन वेळा पोलीसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला अखेर तासाभराच्या घडामोडीनंतर पोलीसांनी अभिषेक उर्फ पप्पू पवार या सराईत चोराच्या रेसकोर्स जवळ मुसक्या आवळल्या.या सर्व चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन संग्राम वरपे-पाटील यांनी यावेळेस केले तर वरपे-पाटील व हिलाल यांनी जी समय सूचकता दाखवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो कर्तव्यदक्षपणा दाखविला तो खरोखरच अभिनंदनीय आहे असे मत विकास भांबुरे यांनी व्यक्त केले.वरपे-पाटील व हिलाल यांनी यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे आभार मानले.
