Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

चोवीस तास मोफत रिक्षा
रुग्णवाहिका योजनेस ३१ मे पर्यंत वाढ

पुणेः-“कोव्हीड महासाथीत देशातील शासन आणि व्यवस्था कोलमडलेली असताना जनता ती सावरायला कशी उभी राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांची ही चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना. रुग्णवाहीकांचा तुटवडा आणि उपलब्ध रुग्णवाहिकांनी सुरु केलेली मनमानी यांवर ही योजना हे एक खणखणीत उत्तर ठरत आहे.
हे सर्व रिक्षा चालक कोव्हीड योद्धे आहेत. आरोग्य सेना त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे, असे उदगार आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ.अभिजित वैद्य यांनी काढले. ते आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या २४ तास मोफत १०२ सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम आरोग्य सेना राष्ट्रीय मुख्यालय येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, निरीक्षक कुमार शेट्ये, जावेद शेख, कादर शेख, मोहसीन शेख, हुसेन शेख उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना बाबा कांबळे म्हणाले, ‘आरोग्य सेनेने आमच्या खांद्याला खांदा भिडवल्यामुळे आम्ही २६ एप्रिल रोजी सुरु केलेली ही अभिनव सेवा खूप मोठे स्वरूप घेवू शकली आहे. जनतेची गरज ओळखून आम्ही ती ३१ मे पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासन जे करू शकत नाही ते आमच्या या रिक्षा चालक योद्धांनी करून दाखविले आहे. या सर्वांना आरोग्य सेनेने या संपूर्ण कालावधीसाठी इंधन खर्च, त्याचबरोबर पी.पी.ई.किट्स आणि रिक्षा सॅनिटाझेशन स्प्रे दिल्याने हे शक्य झाले आहे.”
भोगीलाल आणि कंपनी चे संचालक अतुल शहा यांनी या उपक्रमासाठी २ लाख रुपये किंमतीची वॉशेबल पी.पी.ई. किट्स आरोग्य सेनेला देणगी दाखल दिली.

या प्रसंगी डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते काही रिक्षा रुग्णवाहिका चालकांना इंधन मानधन आणि पी.पी.ई. किट्स देण्यात आली. गरजू रुग्णांनी या सेवेसाठी ९८५०४९४१८९ व ७८४१०००५९८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading