गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस अटक
पुणे, दि. १८ – गँगस्टर छोटा राजन या ची पुतणी असल्याचे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ने अटक केली आहे.
प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय-३६ वर्षे, रा. अनिता अपार्टमेंट, जांभूळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी धीरज साबळे व मंदार वाईकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे दि. १४ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे ही फरार झाली होती.
तिचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सचिन अहिवळे यांना वरील आरोपी महिला ही वानवडी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, उप आयुक्त, गुन्हे-२ चे सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने जांभूळकर चौक, वानवडी येथून तिला अटक केली.
प्रियदर्शनी निकाळजे हिने फिर्यादी यांना राजकीय पक्षाची युवती अध्यक्ष असल्याचे सांगितले होते. तसेच फिर्यादी यांच्या पत्नी व मेहुणीने फिर्यादी यांच्याविरुद्ध प्रियदर्शनी हिच्याकडे तक्रार केलेली आहे व मी छोटा राजन या गँगस्टरची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर ५० लाख रुपये दे’ असे म्हणून खंडणी मागितली होती व खंडणीचे २५ लाख रुपये स्वीकारताना तिचा साथीदार धिरज साबळे याला पोलिसांनी यापूर्वीच रंगेहाथ पकडलेले होते. परंतु मुख्य आरोपी प्रियदर्शनी ही त्यावेळी फरार झाली होती. तिला आज अटक करण्यात आलेली असून, पुढील तपास गुन्हे शाखेचे, खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती सुजाता शानमे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, संपत अवचरे, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केलेली आहे.
