Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

वैज्ञानिक दृष्टीकोनच छद्म विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल – डॉ. हमीद दाभोलकर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या छद्मविज्ञान विरोधी जनजागरण मोहिमेतील ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानात मनोविकारतज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘फसव्या विज्ञानाला लोक का भुलतात? ‘ या विषयावर बोलताना ते म्हणाले “मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती हि जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि सध्याच्या कोविडच्या महामारी काळात ही भीती प्रत्येकाच्या मनात आज ठाण मांडून बसलेली असल्याने आज छदम विज्ञानाच्या दाव्यांना लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहेत.”

आपल्या स्वत:च्या क्षमतेने जे काही आपल्याला मिळू शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आसक्ती, आपली मुले नेहमीच सर्वांपुढे राहावी हि पालकांची अति महत्वाकांक्षा हे मानवी मनाचे गुणधर्मही छदम विज्ञानाच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात हे सांगताना त्यांनी हातावरील रेषा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची बौद्धिक क्षमता वाढविणारी ‘डेक्तोलोग्राफी’ किंवा सध्या जोरात असलेल्या ‘मिड्ब्रेन अक्टीव्हेशन’चे उदाहरण दिले.अनेक आजार हे दीर्घ मुदतीचे व कधीच बरे न होणारे त्यामुळे आपल्याला असे आजार झाले आहेत हे न स्वीकारण्याची मानसिकता असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती किवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा घेऊन चुटकीसरशी बरे करणारे हे फसवे उपचार मानवी मनाला लगेच भुलवतात. असे सांगून त्यांनी चुंबक चिकित्सा, सेरोजेम, प्राणिक हिलिंग, अक्युप्रेशर, अक्युपंक्चर वैगेरे प्रकारचे उपचार छदमविज्ञानी असल्याचे सांगतले. हे बाजारावर अवलंबून असणारे छदमविज्ञानाचे प्रकार असल्याने मागणी तसा पुरवठा तत्वाने यात सतत भरच पडत राहते व नव्या प्रकारांची निर्मिती होत राहते असे त्यानी प्रतिपादन केले.

धर्म आणि छदमविज्ञान यांची अभद्र युती असल्याचे सांगून ते म्हणाले, “एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, आधुनिक आहोत पण त्याचवेळेस आम्ही आमच्या प्राचीन, मूळ संस्कृतीशी कसे जोडले गेले आहोत हे सिद्ध करण्याच्या मानसिक गरजेतून हि युती घडून येते., ह्याचा प्रत्यय आज आपण घेतच आहोत. डॉक्टर, अनेक वैज्ञानिक ‘गोविज्ञाना’ला बळी पडताना दिसत आहेत. हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्राचीन काळात आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होत होती हे गणपतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते’ या पंतप्रधानांनी केलेला दावाही या मानसिकतेतून केल्याचे दिसून येते”

छदम विज्ञानाला बळी पडणाऱ्यांची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलता येणार नाही असे सांगून ‘अंधश्रद्धा निर्मुलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि ऊपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे’ हे नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य उदरुधत करत ते आपल्या भाषणाच्या अखेरीस ते म्हणाले, “हे वाक्य जितके अंधश्रद्धा निर्मूलनाला लागू आहे तितकेच छदमविज्ञानाला देखील लागू आहे. ते सामोरे ठेवतच आगामी कालखंडात छदमविज्ञानाच्या विरोधी संघर्षाला अनिस कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

या व्याख्यानाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या गाण्याने झाली. सूत्र संचालन फारूक गवंडी यांनी केले तर आभार डॉ. अशोक कदम यांनी मानले. तीन दिवसांच्या छदम विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमालेचा समारोप अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading