अपघाताचा बनाव करून ‘मुलगी झाली हो’ च्या अभिनेत्याला भर दिवसा लुटले
पुणे, दि. ११ – ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात होऊन एका व्यक्तीस दुखापत झाली आहे,’ असे सांगून ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहनी याला ५० हजार रुपयांना लुटण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी (दि.८ मे) सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर सोमाटणे एक्झिटच्या अलीकडे घडला.
याबाबत योगेश माधव सोहनी (वय-३२ वर्षे, रा. विजयनगर सोसायटी, स्वामी नित्यानंद मार्ग, अंधेरी, पूर्व मुंबई) यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (शिरगाव चौकी) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी हे एक्सप्रेस हायवेवरून पुण्याकडे जात होते. त्यावेळी सोमाटणे एक्झिटजवळ एक पांढऱ्या रंगाची काळ्या काचा असलेली स्कॉर्पिओ गाडी तेथे आली. गाडीच्या चालकाने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला. सोहनी यांनी गाडी थांबविली. स्कॉर्पिओ गाडी चालक खाली उतरून ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. या अपघाताची पोलिसांत तक्रार करावयाची नसेल तर तू १ लाख ,२५ हजार रु. दे. नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल,’ अशी सोहनी यांना भीती घातली. तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून सोमाटणे फाटा येथील एटीएम जवळ नेऊन एटीएम मधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडले व सोहनी यांच्याकडून जबरदस्तीने ते ५० हजार रुपये काढून घेऊन निघून गेला. पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (शिरगाव चौकी)चे पोलीस उप निरीक्षक गाडीलकर करीत आहेत.
