‘मिशन कोरोना इरॅडिकेशन’अंतर्गत सूर्यदत्ता ग्रुपतर्फे सॅनिटायझेशन पंप, २०० कोरोना सुरक्षा किट वाटप
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘मिशन कोरोना इरॅडिकेशन’ उपक्रमाअंतर्गत तीन सॅनिटायझेशन पंप, २०० रक्तदात्यांना आणि स्वयंसेवकांना रक्तदानास प्रोत्साहन देण्यासाठी कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. एरंडवण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाने हे शिबिर घेतले होते. या कोरोना सुरक्षा किटमध्ये औषधी साबण, जंतुनाशक (डिसइन्फ़ेक्ट स्प्रे), फेस मास्क आदींचा समावेश आहे. मंडळाच्या मागणीनुसार तीन सॅनिटायझेशन पंप भेट देण्यात आले.
एरंडवणे, कर्वेनगर व परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे पंप वापरले जाणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष राम बोरकर यांच्याकडे हे पंप सुपूर्त करण्यात आले. ‘सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, प्रा. नयना गोडांबे आदी उपस्थित होते. बोरकर यांनी यांनी याबद्दल ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व सचिव सुषमा चोरडिया यांचे आभार मानले. शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवेतून काम करणारी ही शिक्षणसंस्था आहे, असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हा ‘मिशन कोरोना इरॅडिकेशन’ उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्येही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रक्ताचे नाते संस्थेचे राम बांगड आणि बावधन परिसरातील लोकप्रतिनिधी-स्वयंसेवकांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन केले. येथे १०० पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले होते. येथेही ‘सूर्यदत्ता’च्या वतीने कोरोना सुरक्षा किट वाटण्यात आले. ‘सूर्यदत्ता’चे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह प्रा. डॉ. श्रीप्रकाश सोनी, भाटु पाटील उपस्थित होते.
“कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. मिशन कोरोना इरॅडिकेशन उपक्रमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासह समुपदेशन, औषधोपचार मार्गदर्शन आदी गोष्टी करण्यात येत आहेत. सध्याच्या काळात रक्ताची, प्लाझ्माची मोठी गरज भासत असून, त्यासाठी शिबिरे व्हावीत, रक्तदान व्हावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून कोरोना सुरक्षा किटचे रक्तदात्यांना, शिबिरातील स्वयंसेवकांना वाटण्यात येत आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
