भारतातील B.1.617 हा कोरोनाचा नवा विषाणू चिंतेचा विषय – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली, दि.११ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारत तणावाची स्थीती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाचे विविध प्रकार समोर आले असून त्यांचे स्वरूपही बदलले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे भारतात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617 प्रकारचा विषाणू जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.
भारतात आढळलेल्या B.1.617 या विषाणूवर सुरूवातीला लक्ष ठेवण्यात आले होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -१९ टेक्निकल लीडच्या डॉ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सोमवारी सांगितले. या विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध भागांमध्ये चर्चा सुरू असून भारतात आणि इतर देशांमध्ये या विषाणूचा कसा प्रसार झाला याचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले.
या विषाणूमुळे भारतातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हटले. “काही प्राथमिक अभ्यासानुसार या स्ट्रेनच्या विषाणूमुळे रुग्णवाढ झाली असली तरी, आम्हाला या विषाणूच्या प्रकाराविषयी अधिक माहिती हवी आहे, म्हणून आम्ही आणखी माहिती गोळा करत आहोत, तसेच भारत आणि इतर ठिकाणांहून अधिक नमुने मिळवण्याची गरज आहे जेणेकरुन हा विषाणू किती पसरला आहे याची माहिती मिळू शकेल”, असे व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.
या विषाणूच्या स्ट्रेनची तीव्रता तपासण्यासाठी याविषयी अधिक माहिती हवी असल्याचे व्हॅन केरखोव यांनी सांगितले. आतापर्यंत आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि त्यावरील उपायांची माहिती आहे, परंतु मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ करणाऱ्या या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी आणखी कठोर योजना आणण्याची आवश्यकता आहे. “नवीन विषाणूचे प्रकार येत असल्याचे आपण पाहत आहोत. विषाणूचा प्रसार मर्यादित करण्यासाठी, संसर्गाला पसरण्यापासून रोखण्यासाठी आणि आपल्या जवळ असलेल्या उपचारांमुळे गंभीर आजार व मृत्यू कमी करण्यासाठी आपण सर्व काही केले पाहिजे”, असे व्हॅन केरखोव यांनी सांगितले.
