मार्केट यार्डात लसीकरण केंद्राचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. १० -कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने सोमवारपासून (दि.१०) करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रात साधारणः दररोज २०० ते ३०० इतक्या लस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बाजार घटकांना आता लस मिळणार आहे.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते लसीकरण केंद्र, तापाचा दवाखाना (फिवर ओ पी डी) आणि रॅपिड एंटीजन टेस्टचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, उपसचिव सतीश कोंडे, दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठीया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, आप्पा गायकवाड, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट आदी यावेळी उपस्थित होते.
त्यावेळी अग्रवाल म्हणाल्या, ‘नागरिकांनी काळजी घेऊन काम करावे. शहरात उपलब्धतेनुसार लसीचा पुरवठा आणि लसीकरण केंद्र वाढविली जात आहे. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत आहे. तसेच पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. लसीकरनानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना त्रास कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणा साठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.’
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले,
लसीकरण केंद्रावर प्रथम प्राधान्याने ४५ वर्षांपूढील बाजार घटकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर येथे तापीचा दवाखाना सुरू केला असून ताप असल्यास कोरोना तपासणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.
डॉ. आढाव म्हणाले, लस म्हणजे पूर्णपणे बरे होण्याचे औषध नाही. मात्र करोनविराधात प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम लस करते. त्यामूळे सर्वांनी आपल्या घरांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
