‘दगडूशेठ गणपती’ ट्रस्टच्या पुढाकाराने प्लाझ्मा चाचणीकरीता ५० हजार रुपयांची मदत
पुणे : कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवनदान ठरत आहे. त्यामुळे ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन विविध स्तरांतून केले जात आहे. मात्र, प्लाझ्मा दान करण्यापूर्वी चाचणी करण्याकरीता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असून, ते शुल्क रुग्णांच्या नातेवाईकांना भरायला लागत आहे. त्यांना ते शुल्क भरायला लागू नये, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने व गणेशभक्त लीना कुरुप यांच्या सहकार्याने आयएसआय रक्तपेढीला ५० हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने व राजीव गांधी टेक पार्क हिंजवडी येथील ग्लोबंट इंडियाच्या कौशल्य-सुलभिकरण संचालिका गणेशभक्त लीना कुरुप यांच्या सहकार्याने नवी पेठेतील इंडियन सिरिओलॉजिकल इन्स्टिटयूट रक्तपेढीकडे ही देणगी सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे संघटक मंगेश सूर्यवंशी, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, राजेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.
सुनील रासने म्हणाले, कोविड काळात ट्रस्टच्या माध्यमातून ससून रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था अविरतपणे सुरु आहे. आरोग्याचे संकट सर्वांवर कोसळलेले असताना चांगल्या दर्जाचे भोजन उपलब्ध करुन देण्याकरीता ट्रस्टतर्फे ससूनच्या आवारातील भोजनकक्षात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याकार्यासोबतच सध्या प्लाझ्माचा तुटवडा जाणवत असताना प्लाझ्मा दात्यांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना चाचणीचा खर्च पडू नये, याकरीता लीना कुरुप यांच्या सहकार्याने ही देणगी देण्यात आली आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, प्लाझ्मा दानाची चळवळ मोठया प्रमाणात सुरु होणे गरजेचे आहे. त्याकरीता अनेक संस्था, संघटना जनजागृती करीत असून प्लाझ्मा दाते व रुग्ण यांच्यामध्ये समन्वयाचे काम करीत आहेत. जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळे देखील प्लाझ्मा दान चळवळीत काम करीत आहेत. प्लाझ्मा दान पूर्वचाचणी करीता देणगी उपलब्ध होत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यास पुढे येऊन रुग्णांचे प्राण वाचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
