Saturday, May 30, 2026
PUNE

‘नवचैतन्य’च्या ऑनलाईन हास्ययोगाने जपले ज्येष्ठांचे शरीर, मनाचे स्वास्थ्य

पुणे : कोरोनामुळे ज्येष्ठांना बाहेर जाता येत नाही. व्यायामाच्या अभावाने त्यांच्यात शारीरिक व्याधी, मानसिक दुर्बलता वाढत असतानाच नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन हास्ययोग वर्ग सुरु केले. लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ नागरिक घरबसल्या व्यायाम करायला लागले. हजारो ज्येष्ठ नागरिकांचे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यात ऑनलाईन हास्ययोग वर्ग महत्वपूर्ण ठरले आहेत. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे , सुमनताई काटे आणि मकरंद टिल्लू हे ऑनलाईन हास्ययोग वर्ग नियमितपणे घेत आहेत.

येत्या २ मे रोजी रविवारी जागतिक हास्य दिन आहे. या दिवशी २००० लोक ऑनलाईन हास्ययोगात एकाचवेळी सहभागी होणार आहेत. तसेच हास्य दिनाच्या निमित्ताने संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘हास्य,आनंद आणि तत्वज्ञान’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. एकाचवेळी २००० पेक्षा अधिक लोकांनी ऑनलाईन एकत्र येत हास्ययोग करण्याचा हा जगातील एकमेव उपक्रम आहे, असे हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर बोलताना हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू म्हणाले, “लॉकडाऊन काळात सर्वाधिक बंधने आली ती, ज्येष्ठ नागरिकांवर. उद्याने, बागा, वॉकिंग प्लाझा सगळेच बंद असल्याने तसेच त्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने घरात बसण्याची वेळ आली. २४ तास घरात बसून त्यांची घुसमट व्हायला लागली. मनोरंजन, गाठीभेटी, व्यायाम, हास्यविनोद आदींच्या अभावाने अनेकांमध्ये नैराश्य येऊ लागले होते. पण ५ ऑगस्ट रोजी हास्ययोग वर्ग सुरु केला आणि पुन्हा एकदा या ज्येष्ठांमध्ये तारुण्याची भावना संचारली. नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत ऑनलाईन योग-प्राणायाम आणि हास्ययोग वर्ग सुरु झाले. आज २००० लोकं रोज ऑनलाईन योग आणि हास्ययोग करत आहेत. हा हास्यक्लब बाबत जागतिक विक्रमच आहे.”

“शारीरिक व्यायामासोबतच प्राणायाम, हास्ययोग शिकवले जात आहे. तसेच सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने मानसिक स्वास्थ्यासाठी, सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन सत्रे, डिजिटल ट्रेनिंग, आरोग्य विषयक तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्याने, कलाकारांच्या मुलाखती, सांस्कृतिक व गाण्यांचे कार्यक्रम आयोजिले जात आहेत. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीसह मनाचीही तंदुरुस्ती साधली जात आहे. अनेकांना यातून आपापल्या व्याधींवर मार्ग सापडला आहे. ज्येष्ठांचा एकटेपणा कमी होतो आहे. शिवाय, फक्त पुण्यातूनच नव्हे तर नगर, नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूर, चंदिगढ, दिल्ली, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका अशा विविध ठिकाणाहून अनेक ज्येष्ठ रोज सकाळी आरोग्य चळवळीत सामील होत आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading