लॉकडाऊनमध्ये गरजूंकरीता जय गणेश व्यासपीठ राबविणार भोजनसेवा
पुणे : गणेशोत्सव मंडळांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या जय गणेश व्यासपीठातर्फे लॉकडाऊनच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, याकरीता भोजनसेवा उपक्रमाला प्रारंभ झाला. बुधवार पेठेतील देहविक्रिय करणा-या महिला, देवदासी व तृतीयपंथीयांना दररोज ३०० तयार भोजनाचे पॅकेट देण्यात येणार आहेत. तसेच बाहेरगावातून पुण्यात वास्तव्याला असलेले विद्यार्थी व गरजूंना देखील विनामूल्य भोजनाची सोय करण्यात येणार आहे.
बुधवार पेठेत महिलांना भोजन वितरण करण्याच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, पीयुष शाह, हनुमंत शिंदे, रामभाऊ सुद्रिक, संतोष भूतकर, तृतीयपंथी प्रतिनिधी पन्ना गारबेल, रवी किरवे, सुरेश कांबळे, पृथ्वीराज येळवंडे, अमर गायकवाड, आनंद सागरे, रवी कांबळे आदी उपस्थित होते.
बुधवार पेठेतील भोजनाची वितरण व्यवस्था महाराष्ट्र तरुण मंडळ, वीर हनुमान मंडळ व गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर, बाहेरगावचे विद्यार्थी व गरजूंकरीता शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट येथे भोजनाची व्यवस्था केली आहे. माजी सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुण्यधाम आश्रम व इस्कॉन पुणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, पुण्यामध्ये गणेशोत्सव मंडळांची ताकद मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, या भावनेने या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. त्यामध्ये बुधवार पेठेतील महिला, विद्यार्थी व गरजूंना भोजनाची सोय करण्यात येणार आहे. सेवा मित्र मंडळाच्या येथे किंवा ८८८८७७९३९३, ९८२३०२३०२१ यावर संपर्क साधल्यास भोजनाची विनामूल्य सोय जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही करुन देणार आहोत. तरी गरजूंनी संपर्क साधावा.
