Friday, September 4, 2026
Business

मार्च २०२१ मध्ये भारतात सोन्याची लक्षणीय आयात

मुंबई –  मार्च २०२१ मध्ये भारतात सोन्याची आयात तब्बल १६० टनांवर जाऊन पोहोचली, विविध घटकांच्या प्रभावामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोन्याच्या आयातीमध्ये ४७१% ची वाढ नोंदवली गेली.  लॉकडाउन निर्बंध शिथिल झाल्यानंतर यूएस, युके यासारख्या निर्यात बाजारपेठांमधून रत्ने व दागिने उत्पादनांच्या मागणीमध्ये झालेली वाढ, भारतात लग्नसराईची सुरुवात, व्यवसायात आलेली तेजी व ग्राहकांमध्ये संचारलेला उत्साह तसेच सोन्याच्या किमतीमध्ये नुकतीच झालेली मोठी घट असे अनेक घटक सोन्याच्या आयातीमध्ये झालेल्या वाढीस कारणीभूत ठरले असल्याचे जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलकडून (जीजेईपीसी) सांगण्यात आले आहे.

सोन्याच्या मागणीत झालेल्या वाढीला कारणीभूत ठरलेल्या अनेक घटकांमध्ये देशांतर्गत बाजारपेठांमध्ये आणि विविध देशांमध्ये याच काळात आलेले सणासुदीचे दिवस, खाणकाम आणि निर्यात व्यवसायाची तसेच देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये उत्पादन कामांची पुन्हा सुरुवात, लस तयार केली गेली आणि लसीकरण सुरु झाले व प्रवासावरील निर्बंध सैल झाले इत्यादींचा समावेश आहे.

याशिवाय जीजेईपीसीने अनेक वेगवेगळ्या व्हर्च्युअल जेम व ज्वेलरी ट्रेड शोंचे आणि विक्रेते-खरेदीदारांच्या संमेलनांचे (व्हीबीएसएम) आयोजन केले, ज्यामुळे भारतीय उत्पादकांकडून विविध रत्ने व दागिने उत्पादनांसाठी नोंदवल्या जाणाऱ्या ऑर्डर्सना भरपूर प्रोत्साहन मिळाले.

देशांतर्गत मागणीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे सोन्याच्या आयातीला प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगत जीजेईपीसीचे चेअरमन  कोलीन शाह यांनी सांगितले, “योग्य, सुस्पष्ट निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये बाजारपेठेतील एकंदरीत ट्रेंड्सचे आपण सर्वसमावेशक पद्धतीने अवलोकन केले पाहिजे.  मागील वर्षीची आयात कमी असणे, सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घसरण, आयात शुल्क कमी होणे यासारखे घटक या काळात देशात सोन्याची आयात वाढण्याला कारणीभूत ठरले.  एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे २०१८-१९ मध्ये सोन्याची सरासरी आयात जवळपास ८० टन होती जी मागच्या वर्षी ५० टनांपर्यंत कमी झाली.” 

मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे अवघे २८ टन सोने आयात करण्यात आले, त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या यंदाच्या वर्षीची सोन्याची आयात सरस ठरली आहे.  सर्वसाधारण परिस्थितीत एका महिन्याभरात सरासरी ६० ते ८० टन सोने आयात केले जाते.  परंतु मार्च २०२० मध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दागिन्यांच्या मागणीत कमालीची घट झाली आणि त्यामुळे मार्च २०२० मध्ये सोन्याची आयात २८ टन इतकी खाली घसरली.  मार्च २०१९ मध्ये हीच आयात तब्बल ९३ टन होती.

 कोलीन शाह यांनी पुढे सांगितले, “सोन्याच्या आयातीमध्ये झालेली वाढ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मकता दर्शवते. या आर्थिक वर्षात दागिन्यांच्या निर्यातीमध्ये वाढ होईल अशी देखील आशा मला वाटते.” 

मागणीमध्ये वाढ होण्याला सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घट देखील कारणीभूत आहे.  सोन्याच्या किमती लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या आहेत.  या किमती भविष्यात कायम राहण्याची शक्यता नसल्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार या संधीचा लाभ घेत आहेत.  मार्च २०२१ मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये सरासरी ४०१७९ रुपयांपर्यंत घसरण झाली.  एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या आर्थिक वर्षातील ही सोन्याची सर्वात कमी किंमत नोंदवली गेली. 

सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यात आल्यापासून अधिकृत माध्यमांतून सोन्याची आयात वाढली आहे. कोलीन शाह यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आयात शुल्क कमी झाल्याने अधिकृत माध्यमांद्वारे होणाऱ्या आयातीला चालना मिळाली आहे. सरकारने सोन्यावरील शुल्कात केलेली घट फार जास्त जरी नसली तरी त्यामुळे आयात शुल्क इतर देशांइतके होण्यात मदत झाली आहे आणि अधिकृत माध्यमांद्वारे धातूच्या अधिक औपचारिक आयातीला त्यामुळे प्रोत्साहन दिले गेले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading