Saturday, May 30, 2026
NATIONALTOP NEWS

कोरोना – देशात रुग्णवाढीने ओलांडला २४ तासात २ लाखांचा टप्पा

नवी दिल्ली – महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील कोरोना परिस्थिती प्रचंड बिकट झाली असून देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तब्बल दीड लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मागील 24 तासांत देशात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या २ लाखांच्या पुढे नोंदविण्यात आली असून १ हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात भारतात 2,00,739 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,038 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,40,74,564 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,73,123 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 93,528 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,24,29,564 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 14,71,877 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता, त्यानंतर आज दैनंदिन रुग्णवाढीने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading