क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येणार लसीकरण मोहीम  

पुणे, दि. 7 – सामाजिक कार्यासाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने या वर्षभराच्या काळात कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या भागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

सरकारच्या परवानगी नंतर महानगरपालिकेच्या मदतीने ही कामगारांसाठीची सर्वांत मोठी लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार असून, याचा फायदा काही लाख कामगारांना होणार आहे. मागील वर्षीच्या टाळेबंदीदरम्यान क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. ज्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून देण्याबरोबरच गरजू मजुरांना बांधकामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर्स व तयार जेवण पुरविणे यांचा प्रामुख्याने समावेश होता .

याबरोबरच संस्थेच्या वतीने सध्या एसबीआय सोबतच अनेक बँकाच्या वतीने वाढविण्यात येणा-या गृहकर्जाच्या व्याजदरासंदर्भांत देखील चिंता व्यक्त करण्यात आली असून, आधीच संकटांच्या काळात झगडणारे बांधकाम क्षेत्र यामुळे आणखी कमकुवत होईल, अशी काळजी व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, “मागील वर्षी गृहकर्जाच्या व्याजदराचा कमी झालेला दर आणि मुद्रांक शुल्कात मिळत असलेली सवलत लक्षात घेत बांधकाम क्षेत्राला उभारी घेण्यासाठी एक आशेचा किरण दिसत होता. मात्र आता गृहकर्जाच्या व्याजदराचा दर वाढल्याने या क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्राशी इतर किमान २५० व्यवसाय आणि लाखो कामगारांचे भविष्य निगडीत असल्याने याचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा.”

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात बांधकाम विकासकांना आपले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन दिलेली वेळ पाळण्यासाठी कामगारांची आवश्यकता आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर ही मोठी समस्या आमच्या समोर उभी राहू शकते, असेही त्यांनी सांगितले.

वर्षभराच्या परिस्थितीनंतर आता कुठे बांधकाम क्षेत्र पुन्हा उभे राहत असताना टाळेबंदीच्या भीतीने अनेक मजूर शहर सोडून जात आहेत. त्यांना थांबविण्यासाठी आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करीत असून बांधकामाच्या ठिकाणी सॅनिटायझर्स व आरोग्याची काळाजी घेण्यासंबंधीची सर्व काळजी आम्ही घेत आहोत, मात्र मजुरांच्या स्थलांतराने सध्या अनिश्चिततेचे वातावरण असल्याचेही फरांदे यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: