Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणारे मुख्यमंत्रीच त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत’

मुंबई – मुख्यमंत्री हतबल झाले आहेत, काय उपयायोजना करायच्या हे ते लोकांना विचारत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकरांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नियोजनावर टीका केली. तसेच, त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली.

राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाड म्हणतात 20 लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारीच पाठवून देऊ, असं सांगतानाच केवळ अपयश आल्याने आघाडी सरकारकडून भावनिक आवाहन केलं जात आहे. लोकांना संभ्रमित केलं जात आहे, असंही ते म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही रस्त्यावर उतरूच. तुम्ही मातोश्रीत बसून होतात. त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. पण तुम्ही लोकांमध्ये जा आणि लॉकडाऊनमुळे होणारं त्यांचं नुकसान समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक राजकारण करत आहेत. विरोधकांनी राजकारण करू नये. असं सांगतानाच मुख्यमंत्रीच स्वत: शेरेबाजी करत विरोधकांवर टीका करत आहेत. हे राजकारण नाही का? असा सवाल करतानाच कोरोनाला सव्वा वर्षे झाले आहे. या सव्वा वर्षात मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांशी एकदाच संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत विरोधकांशी काहीच चर्चा केली नाही. मुख्यमंत्र्यांचा केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांच्या पायात पाय नाही. त्यांच्यातच समन्वय नाही. तुम्हीच पायात पाय घालून पडणार आहात, असा चिमटाही त्यांनी काढला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading