पहिले ते आठवीचे विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात – वर्षा गायकवाड

मुंबई, दि, ३ – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याची चर्चा सुरू असताना पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय शालेय ठाकरे सरकारने घेतला आहे. याबद्दल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मधल्या काळात ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. तर काही ठिकाणी सुरू करू शकलो नाही. पण कोरोनाची परिस्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहे, त्यांची परीक्षा घेणे शक्य नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाच्या परिस्थितीत  परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. 1 ली ते इ. 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष 2020- 21 मधील कोविड 19 ची अपवादात्मक परिस्थिती पाहता  इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं गायकवाड यांनी सांगितले.

इयत्ता  1 ली ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया. कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. 1 ली ते इ. 8 वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. 9 वी आणि इ. 11 वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: