क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी अनिल फरांदे

पुणे, दि. ३१ – कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाईच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी एकमताने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व फरांदे प्रमोटर्स अॅण्ड बिल्डर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे यांची निवड करण्यात आली  आहे. मावळते अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्याकडून फरांदे यांनी आज सूत्रे स्वीकारली. पुढील दोन वर्षे म्हणजे एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान अनिल फरांदे हे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने कळविण्यात आली आहे.

याबरोबरच रणजीत नाईक, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून अरविंद जैन (सचिव), आय. पी. इनामदार (खजिनदार) तर तेजराज पाटील हे मानद सहसचिव म्हणून पुढील दोन वर्षांसाठी काम पाहतील. याशिवाय इतर आणखी १६ सभासद देखील या कार्यकाळात व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहतील.            

पुणे क्रेडाई मेट्रो ही पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम विकासकांची १९८२ साली स्थापन झालेली आयएसओ – ९००१- २०१५ नोंदणीकृत संस्था आहे. धर्मादाय आयुक्तांकडे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० अंतर्गत संस्थेची नोंदणी करण्यात आली असून संस्थेचे १४०० सभासद आहेत. कोविड १९ च्या आव्हानात्मक काळात क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेच्या अंतर्गत येणा-या रुग्णालयांमध्ये सुसज्ज असा अतिदक्षता विभाग सुरु करणे, ऑक्सिजन खाटा बसविणे यांबरोबरच गरीब व गरजू नागरिकांना व मजुरांना सॅनिटायझर, मास्क, जेवण पुरविणे अशा विविध पातळ्यांवर काम करण्यात आले.

याशिवाय सरकारी व निम सरकारी स्तरावर विविध धोरणे बनविण्यात देखील क्रेडाई पुणे मेट्रो नेहमीच आघाडीवर असते. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम प्रकल्प ठिकाणच्या सुरक्षिततेविषयी मजूरांमध्ये जागृती निर्माण करणे त्यांना कौशल्य निपुण बनविणे यावर संस्थेचा भर असतो. कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, त्यासंबंधी जागरूकता निर्माण करणे, पल्स पोलिओ अभियान यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील संस्थेच्या वतीने करण्यात येते.          

पुणे शहराला आरोग्याच्या दृष्टीने बळकटी देण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या  प्रयत्नांना मदतीचा हात पुढे करीत, संस्थेने १६ हजारांहून अधिक शौचालयांची उभारणी केली आहे. सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत संस्था व सभासदांच्या वतीने वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: