मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचं गूढ उकलल्याचा शिवदीप लांडेे यांचा दावा

मुंबई – राज्यभरात चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचं गूढ उकललं असल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी केला आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत खात्यावर ही माहिती दिली आहे. याबाबत सोमवारी पत्रकार परिषदही घेतली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. मनसुख हिरेन यांची नक्की हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र हिरेन यांची हत्याच झाली असून त्याबाबतचं गूढ उकलल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी अद्याप 2 व्यक्तींना अटक करण्यात आली असून आगामी काळात आणखीही काही व्यक्तींना अटक केली जाईल, अशी माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात नक्की कोण-कोण तुरुंगात पोहोचतं हे पाहावं लागेल.

शिवदीप लांडे हे आपल्या डॅशिंग कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणं निकाली काढली आहेत. मात्र शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाविषयी लिहिताना म्हटलं आहे की, हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं प्रकरण होतं.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयए या तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला होता. याबाबतच्या घडामोडी होताच एटीएसने तपास पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. शिवदीप लांडे यांनी थेट सोशल मीडियावरच या हत्या प्रकरणाचं गुढ उकललं असल्याचा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: