उत्तम व्यावसायिक यश मिळविणारे कानेटकर हाडाचे प्रायोगिक नाटककार : श्रीनिवास भणगे

पुणे : नाटकांची अवस्था तुंबल्यासारखी झालेली असताना कानेटकरांनी नाटकाची भाषा बदलून कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ऐतिहासिक नाटकातून त्यांनी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना सामाजिक संदर्भ देऊन ऐतिहासिक नाटकांना समांतर जाणारी नाटके लिहिली. वसंत कानेटकर म्हणजे उत्तम व्यावसायिक यश मिळविणारे हाडाचे प्रायोगिक नाटककार होते, असे गौरवोद्गार प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यांनी काढले. प्रायोगिक नाटककार असल्यामुळेच त्यांना व्यावसायिक नाटकात यश मिळाले, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणेतर्फे सिद्धहस्त नाट्यलेखक प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘वसंत नाट्य यज्ञ’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या नाट्य यज्ञाचे उद्घाटन आज (दि. 20) भणगे यांच्या हस्ते ‘वेड्याचे घर उन्हात’ या कानेटकर यांच्या पहिल्या नाट्यसंहितेचे आणि नटराजाचे पूजन करून झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे, गायक-अभिनेते संजीव मेहेंदळे आणि भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल मोहन मुळे रंगमंचावर होते. ‘वसंत नाट्य यज्ञ’ या कार्यक्रमाची संकल्पना विश्वस्त रवींद्र खरे यांची आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कानेटकर यांच्या 41 नाटकांतील निवडक प्रवेशांचे अभिवाचन होणार आहे.


भणगे म्हणाले, ‘वेड्याचे घर उन्हात’ या नाटकातील काही प्रवेश दिवास्वप्नांचे आहेत, जे मराठी नाटकांमध्ये आधी कधी झालेले नव्हते. या दिवास्वप्नांमध्ये कानेटकरांनी छान पद्धतीने मनोविश्लेषण उलगडून दाखविले आहे. ‘देवांचे मनोराज्य’ ही नाट्यकृती कल्पनारम्य असली तरी त्यात खूप गर्भितार्थ आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे सामाजिक विषयावर आधारित नाटकही त्यांनी दिले. त्यात विनोदाबरोबरच तत्त्वज्ञानाचीही मांडणी त्यांनी केली आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाट्यकृतीतून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वामधला माणसाचा कानेटकरांनी घेतला शोध फक्त स्तुत्यच नव्हे तर पूज्य आहे. ‘लेकुरे उदंड जाहली’ ही अजरामर कलाकृती साध्या सोप्या संगीताद्वारे त्यांनी मांडली.
वसंत नाट्य यज्ञाविषयी विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी माहिती दिली. भणगे यांचा सत्कार अध्यक्ष आनंद पानसे आणि मोहन मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: