अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र रोहण यांना अटक, पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई

पुणे- बँकेतील डोरमंट (निष्क्रिय खाते) खात्यांचा गोपनीय डाटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक महिलेसह अटक केलेल्या आठ जणांमध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना २० मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास 2 अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. बातमीची खातजमा करुन पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली.

पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्ल्क असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती लोकमतने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: