माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगालसह एकूण ५ राज्यांच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. मात्र, सर्वाधिक राजकीय घडामोडी सध्या पश्चिम बंगालमध्येच होत आहेत. आता एकेकाळी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या ८३व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमकी यामागे तृणमूल काँग्रेसची काय चाल आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

एकेकाळी भाजपच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.

भाजपला रामराम ठोकल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे किती फायदा होईल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे आहेत. १९६०मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली.आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये देखील बरीच महत्वाची पदे भूषवली. १९८४मध्ये त्यांनी राजीनामा देऊन जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ते राजकारणात सक्रीय झाले. १९८८मध्ये पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याच काळात म्हणजे १९९०-९१मध्ये भारताच्या प्रख्यात खासगीकरण, जागतिकीकरण धोरणाची बिजं रोवली गेली.

Leave a Reply

%d bloggers like this: