Saturday, May 30, 2026
BLOGMAHARASHTRATOP NEWS

“फडणवीसांचा तर्क विसंगत थयथयाट”

असे म्हणतात… ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’..! परंतु विरोधीपक्ष नेते मा फडणवीस यांची मात्र नेमकी या विरोधी भूमिका आहे…! मुंबई पोलीस गुप्तवार्ता विभागाचे श्री सचिन वाझे यांना ‘तातडीने अटकच्’ करण्याची मागणी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत राणाभीमदेवी थाटात करत असून, त्यांचा या करिता थयथयाट चालल्याचे दिसते आहे. दुसरीकडे मात्र ज्या सचिन वाझे यांनी (अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी) ‘रिपब्लिक टीव्ही’च्या टीआरपी घोटाळ्याचे आरोप असलेल्या अर्णब गोस्वामीना अटक केली होती, त्या प्रकरणात अर्णब गोस्वामीना ‘जामीन मंजूर करतांना’ सुप्रीम कोर्टाने “मुंबई पोलिसांच्या कारवाई बाबत” भाष्य केले होते. ‘त्या कॉमेंट’वर त्याच वेळी ‘विविध मते’ देखील प्रतिबिंबित झाली. परंतु ते लक्षात न घेता कोर्टाने ‘मुंबई पोलिसांवर’ अर्णब गोस्वामीच्या अटकेवर केलेले ताशेरे’ उद्घोषित करून, त्यामुळे ‘मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले(?)’ असे ही निंदनीय आरोप केले..! मात्र ‘कोर्टाची कॉमेंट’ फडणविसांनीच जरी ग्राह्य मानली तर असेच समजले पाहिजे की “मुंबई पोलिसांनी घाई गर्दीत निष्पाप व्यक्ति वा पुरेशी कायदेशीर काळजी न घेता घिसडघाईने कार्यवाई करू नये व जर कार्यवाई केली” तर कोर्ट प्रसंगी “ताशेरे देखील ओढते,” मग हे माहीत असूनही फडणविसांचे मात्र ‘कळते पण वळत नाही’ असे झाले. मग निव्वळ तुम्ही म्हणता म्हणून चौकशी होण्या अगोदरच अटक करावी हा अट्टहास का..? कारण एकीकडे कायदेशीर नियमांची पायमल्ली झाल्यास कोर्टाने मुंबई पोलिसांचे वाभाडे काढले हे देखील आपणच स्पष्ट करत आहात.. मग “आपल्या स्वतःच्याच दोन भूमिकांमध्ये” विरोधाभास व विसंगती का..? फडणविसांना नेमके काय सांगायचे वा साध्य करायचे आहे हे त्यांनाच समजेनासे झाले आहे.. कारण त्यांचे करकीर्दीतील त्यांच्या ठायी असलेले अनुभवातून त्यांनी स्वतःच पूर्वगृहदुषीतपणे चौकशी प्रकरणांकडे पाहणे हा फडणविसांचा दोष आहे, तो राज्य सरकारचा दोष नाही. किंबहुना केंद्र सरकार च्या अखत्यारीतील एनआयए देखील याची चौकशी करीत असल्याचे देखील मा फडणविसांनी विसरू नये, व नाहक आदळ आपट करू नये..!

देशातील अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अॅन्टीलिया’ बांगल्या जवळ आढळलेली एक स्कॉरपीओ गाडी मध्ये काही ‘जिलेटीन कांड्या’ मिळाल्या व ज्या गाडीची फक्त “पोलीस चौकशीच नाही” तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील “एनआयए” मार्फत देखील चौकशी चालू आहे, त्याच्या मालकाचा ( मनसुख हिरेन) झालेला संशयस्पद मृत्यू वर विधानसभेत गदारोळ सुरू आहे. या विषयाचे गांभीर्य पाहता, वस्तुस्थितीची सखोल चौकशी होणे व सत्य बाहेर येणे निश्चितच गरजेचे आहे, निव्वळ ते उद्योगपती हे मुकेश अंबानी आहेत, म्हणून नाही, तर इतर ‘कोणाही नागरिकाच्या घराजवळ’ अशी संशयास्पद गाडी आढळली असती, तरीही ते तेवढेच गांभीऱ्याचे होते.. मृत मनसुख हिरेन यांच्या ‘पत्नीच्या पत्रात’ शेवटच्या वाक्यात केलेल्या सचिन वाझे यांचे विषयी व्यक्त संशया विषयी सखोल चौकशी होणे बाबत मा गृहमंत्री यांनी स्पष्ट संकेत दिले असून वाझे यांची तातडीने बदली देखील केली आहे ही बाब देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विश्वास व्यक्त करून त्यांना पुरेसा अवधि दिला पाहिजे. तसेच या प्रकरणी दुसरी बाब देखील लक्षात घेतली पाहिजे की देशातील अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यावर हेलीपॅड करिता परवानगी देखील त्यांना हवी आहे. या अनुषंगाने कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या विषयी शंका व्यक्त केली आहे व आरोप देखील केला आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘एकंदर मागील सत्तेचा व विरोधी पक्षातील कार्यकाल’ लक्षात घेता त्यांच्या ‘विसंगत थयथयाट’ विषयी त्यांचा हेतु स्पष्ट होतो.

देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री असतांनाच् न्यायमूर्ती जस्टीस लोया यांचा नागपूर मध्येच “हत्येच्या आरोपाचा मृत्यू” (१डीसें.२०१४) पासून ते कॅा. गोविंद पानसरे यांचा खून (२०फेब्रू१५), कोपर्डी येथील दुर्दैवी घटना (१३जुलै१६), भीमा कोरेगाव दंगल प्रकरण(१जाने१७), अन्वय नाईक आत्महत्या (मे१८), नागपूर मधील वाढती गुंडगिरी, शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या… हे सर्व “फडणवीस सरकारच्याच् कारकिर्दीत” घडले व राज्यात “गुन्हेगारी प्रमाणदर” सर्वाधीक झाले याचे विस्मरण देखील तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना झाले काय..? हा देखील योगायोग आहे का(?) की वरील कारकीर्दीतील काही गुन्हे वा गुन्हेगारांचा फोलपणाचा पर्दाफाश देखील होत आहे, आणि म्हणून फडणवीसांचा त्रागा होत आहे..? राज्यात बालके व महीलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण ‘महाविकास आधाडी’ सरकार आल्यापासून सु ३०% नी कमी झाले..! ही वस्तुस्थिती नजरेआड करू शकत नाही…या पोलिसांच्या कृती विषयी बोलतांना राज्यातील ‘गुन्हेगारीचा प्रमाण-’दर’ कमी झाल्याची नोंद तरी ‘जागरूक विरोधीपक्ष नेत्यांच्या ठायी पाहीजे आता कोणाचे ‘थोबाड’ नव्हे तर ‘तोंड’ काळे झाले म्हणायचे’…(?) पण आम्ही ‘तसे म्हणणार नाही’, कारण आमचे ‘ते संस्कार’ नाहीत… ‘राज्यातील गृहखात्याची प्रत्यक्ष आकडेवारी’वर देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे….!

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असे भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती.
याच सभागृहात, ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात “विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याच” आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं…मात्र पुढे विजयकुमार गावीत भाजप आमदार झाले.
याच सभागृहात, त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे असल्याचे देखील सांगितले होते. मात्र स्वतः मुख्यमंत्री पदाची व गृहमंत्री पदाची संपूर्ण ५ वर्षांची कारकिर्दीत साधा ‘एफआयआर’ दाखल करू शकले नाहीत, ना कोणतेही आरोप सिद्ध करू शकले..!
याच सभागृहात, तत्कालीन कॉँग्रेसवासी मा नारायण राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली… पुढे काय तर त्यांना राज्यसभा मिळवून दिली..!

याच सभागृहात, विद्यमान विधान परिषद पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या “मुंबई बँक घोटाळा” पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली होती, मात्र पुढे काय तर स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेऊन विधानपरिषदेचे आमदार केले इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना शिक्षकांची वेतन बँक खाती “मुंबई बँकेत” वळवली परंतु कोर्टाने फटकारल्यावर खाती मागे घेतली.
याच सभागृहात, विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर सिंग यांच्या घोटाळ्याची कागदे नाचवली पण स्वता मुख्यमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध ही काही सिद्ध करू शकले नाही व चौकशी करायची नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिले।
खोटेनाटे आरोप करून, दिशाभूल करून, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची “पाच वर्षांची” संपूर्ण टर्म व “स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री” राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे… पूर्वी “विरोधीपक्षात असतांना केलेल्या एकही आरोप सिद्ध करू शकले नाही” वा “कोणत्याही आरोपा बाबत चौकशी वा कारवाई देखील केलेली नाही”, हीच सत्य परिस्थिति आहे.. त्या मुळे एका गावातील लबाड मुलगा जसा ‘कोल्हा आला रे आला’ असे सांगून ‘गावकऱ्यांना फसविण्यात आनंद व यश मानत असतो’ असाच प्रकार विरोधीपक्ष नेते असलेल्या फडणविसांचे बाबतीत झाला आहे.. त्या मुळे त्यांचा अभिनिवेष व त्रागा हा निव्वळ ‘तर्क-विसंगत थयथयाट’ असून, जनता आता याला भुलणारी नाही..! कारण संघाच्या पठडीत वाढलेल्या भाजपतर नेत्यांची जुनी सवय व संस्कार पहिले की हे दिसून येते की, स्व लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू असो वा सुभाषचंद्र बोस असो, स्व संजय गांधी असो वा स्व राजीव गांधीचे वरील बॉम्ब स्फोट हल्ला असो कुंभाडखोरीने व उथळपणाने नाहक संशय निर्माण करणे व त्यातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणे हेच दिसून आले आहे…!

– गोपाळदादा तिवारी ( लेखक काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading