लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ५१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व मुखवटा

पुणे :  बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात ५१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन ही चक्केश्वराची पूजा साकारण्यात आली. माधव जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला. 

महाशिवरात्रीनिमित्त स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. मंदिरातील पुरुषोत्तम वैद्य गुरुजी, चं.रा.कासार, युवराज पवार, भारती माटे, विनायक झोडगे, लक्ष्मीबाई पत्की, वैभव निलाखे, ॠषिकेश अभंग आदींनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास दोन तासात साकारली. 

सुनील रुकारी म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी ५१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा केलेला मुखवटा हे विशेष आकर्षण होते. बदाम, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना तसेच सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: