‘एआयटी’च्या ‘इनरव्ही ५.०’ राष्ट्रीय हॅकेथॉनचेविजेतेपद पश्चिम बंगालच्या ‘एस-टर्निओन’ला

उपविजेतेपद चेन्नईच्या ‘दिवा-कोडर्स’ व पुण्याच्या ‘सीओईपी’च्या ‘लिओ-कोड’ला

पुणे : पश्चिम बंगालच्या जेआयएस अभियांत्रिकी महाविद्यालयच्या ‘एस-टर्निओन’ संघाने दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) वतीने आयोजित ‘इनरव्ही ५.०’ या पाचव्या वार्षिक राष्ट्रीय हॅकेथॉनचे विजेतेपद पटकावत एक लाख रुपयाचे रोख पारितोषिक व ३० हजारांची कुपन्स जिंकले. ‘एआयटी’च्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबच्या वतीने ही राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत चेन्नई (तामिळनाडू) येथील लोयला आयकॅम अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या ‘दिवा कोडर्स’ आणि पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘लिओ कोडर्स’ या संघानी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवत ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व २० हजाराचे कुपन्स जिंकले. चेन्नईच्याच ‘एसआरएम आयएसटी’च्या ‘गार्लिक ब्रेड’ आणि नवी दिल्लीच्या भगवान परशुराम इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीच्या ‘कॉर्टेक्सकेस’ या संघानी उत्तेजनार्थ यश मिळवले. त्यांना प्रत्येकी दहा हजाराचे रोख व दहा हजाराचे कुपन्स देण्यात आले. टीम ‘सर्चइझ’ आणि ‘रेट्रोसिंथ’ यांच्या सादरीकरणामध्ये उत्कृष्ट ‘युआय डिझाइन’ होते. ‘लेफ्ट ओव्हर_अल्गोरिथमस’ला सामाजिक प्रकल्पाचे उत्कृष्ट बक्षीस देण्यात आले. अंतिम फेरीतील प्रत्येक स्पर्धकाला विविध भेटवस्तू देण्यात आल्या.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट या क्लबला, विद्यार्थ्यांना मदतीसाठी, तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असतात. स्पर्धेच्या निकालावेळी बोलताना ते म्हणाले, “आमचे विद्यार्थी समाजामध्ये चांगले योगदान देत आहेत. ‘एआयटी’सह इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही तंत्रज्ञानाची रुची निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांमार्फत भरविण्यात येणारी ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेतील विजेत्याला एक लाख, उपविजेत्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आपले तांत्रिक कौशल्य परीक्षकांना समोर सादर करतात.”

फॅकल्टी समन्वयक प्रा. अनुप कदम व विद्यार्थी समन्वयक अक्षय शर्मा यांच्या माहितीनुसार, “तरुणांच्या मनातील कल्पनांना वाव देण्यासाठी ‘इनरव्ही’ ही हॅकेथॉन असून, यावर्षी भारतातील एक हजाराहून अधिक तर २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय नोंदणी झाल्या. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना परीक्षकांसमोर मांडायच्या असतात. यावर्षी १६ टीमला अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या फेरीत विद्यार्थ्यांना २४ तास काम करायचे असते. परीक्षकांकडून स्पर्धकांना २४ तासात कधीही गरज पडल्यास मार्गदर्शन केले जाते. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नुकतेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन केले होते. उडचलो, कागज अँड हशमॅप इंक आणि मिनी-गेम्स या कंपन्यामधील विविध वक्त्यांची स्पर्धकांसाठी सत्रे घेण्यात आली.”

Leave a Reply

%d bloggers like this: