‘सूर-सरीता’ महोत्सवात रंगली गायन-वादनाची मैफल
पुणे : दुर्गा, झिंझोटी, दरबारी, शुद्धकल्याण अशा वेगवेगळ्या रागांचे सादरीकरण करीत गायन-वादनाची मैफल रंगली ती दोन दिवसीय सूर-सरीता संगीत महोत्सवात. मैफल ऑनलाईन झाली तरी रसिकांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरली.
सोलापूर येथील सतारवादक कै. सरीता मित्रगोत्री यांच्या स्मरणार्थ मित्रगोत्री परिवार व मनहर संगीत सभा यांच्यातर्फे सूर-सरीता या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी रसिकांच्या उदंड प्रतिसादात होणारा हा महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंडित हेमंत पेंडसे यांच्या फेसबुक पेज व यू ट्यूब चॅनलवर ऑनलाईन झाला.
महोत्सवाची सुरुवात अमेरिकास्थित संपदा भालेराव यांच्या सतारवादनाने झाली. पूर्वार्धात त्यांनी दुर्गा रागात विलंबित तीनतालात वादनास सुरुवात केली. मिश्र खमाजमधील उपशास्त्रीय गत सादर केली. अमेरिकेत राहून देखील त्यांनी सतारवादनाची केलेली साधना चांगलीच वाखाणण्याजोगी आहे. चॅझ हॅस्टिंग यांची तबलासंगत रसिकांना विशेष भावली.
मैफिलीच्या उत्तरार्धात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य व प्रसिद्ध गायक पं. हेमंत पेंडसे यांनी वैशिष्ट्यपूर्ण आलापी सादर करून धीरगंभीर वातावरण निर्मिती केली. ‘गरब न किजे’ या दरबारी कानड्यातील विलंबित एकतालामधील रचनेला रसिकांनी लाईव्ह चॅटमधून भरभरून दाद दिली. यानंतर पेंडसे यांनी पंडित सी. आर. व्यास बुवानिर्मिती शिवअभोगी हा अप्रचलित राग मोठ्या ताकदीने मांडला. तसेच पेंडसे यांनी पंडित व्यासबुवांवर स्वतः केलेली बंदीश सादर करून शेवटी याच रागातील पंडित व्यासबुवांची ‘नित रहे मगन तो मे’ ही बंदीश सादर करून मैफिलीचा समारोप केला. पंडित पेंडसे यांना अभिजित बारटक्के (तबला) व स्वानंद कुलकर्णी (हर्मोनियम) यांची समर्पक साथ लाभली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित सुधीर नायक यांच्या वादनाने झाली. त्यांनी झिंझोटी राग सादर करून मैफल रंगतदार केली. त्यांनी सादर केलेला बसंतबहार हा जोडराग व मिश्र रागामधील रचना रसिकांची दाद मिळवून गेल्या. विघ्नेश कामत यांची तबला संगत देखील उल्लेखनीय होती.
सूर-सरीता महोत्सवाची सांगता किराणा, आग्रा, ग्वाल्हेर, घराण्याच्या विशेष तालीम घेतलेल्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्या गायनाने झाली. डॉ. पौर्णिमाजींनी गायनाची सुरुवात शुद्धकल्याणने केली. या रागातील पारंपरिक बंदिशींची मांडणी करतानाही रागशास्त्र व रागसौंदर्य ह्या दोहोंचा मेळ घालत
वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण केले. मैफिलीची सांगता भैरवी रागातील प्रसिद्ध रचनेने केली. त्यांना अरुण गवई (तबला) व लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम) यांनी समर्थपणे साथसंगत केली. डॉ. पौर्णिमा धुमाळे गायिका म्हणून प्रसिध्द आहेतच पण गुरू म्हणून देखिल त्या कार्य करीत आहेत.
डॉ. समीर मित्रगोत्री यांनी प्रास्तविक तर ईश्वरी पेंडसे यांनी निवेदन केले. संपदा भालेराव यांनी आभार मानले. मैफिलीचे रेकॉर्डींग डॉटव्हेव स्टुडीओत करण्यात आले होते.
‘सूर-सरीता’ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा संगीत रसिक श्रीरंग कुलकर्णी पुरस्कृत कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी स्मृती युवा पुरस्कार युवा गायक तेजस मेस्त्री यांना देण्यात आला.
