fbpx
Wednesday, May 8, 2024
ENTERTAINMENTMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

पुणे – ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं आहे. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, पु ल देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये ‘दिल देके देखो’या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे हे त्यांचे बंधू होत.स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव आहेत व अभिनेत्री प्रिया मराठे या सुनबाई होत. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.

श्रीकांत मोघे हे नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता या बरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद होते, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले.

बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले. श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला. श्रीकांत मोघे यांनी 1951-52 मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने 1955 साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी 1956 मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली. 1957साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत मोघें यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी श्रीकांत मोघे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून लागले. त्या सुमारास पु.ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली. घराबाहेर, लग्नाची बेडी, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, आंधळ्यांची शाळा, वा-यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली, सीमेवरून परत जा, आदी नाटकांतून ठसा उमटवणा-या मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading