‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द; सदस्य नोंदणी होणार ऑनलाईन

मुंबई, दि. ७ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या ९ मार्च रोजीचा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यादिवशी राज्यभर मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

येत्या ९ मार्च रोजी मनसेचा १५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार होता. मात्र, कोरोनामुळे यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्याचे नांदगावकर यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

गेली १४ वर्ष कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता महाराष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले असंख्य महाराष्ट्र सैनिक पक्षासोबत आहेत. पद नसतानाही त्यापैकी अनेकजण उत्तम कामगिरी बजावत आहेत. अशांपैकी ज्यांना स्वतः निवडणूक लढण्यात स्वारस्य नसेल, पण संघटनात्मक काम करण्यास इच्छुक असतील, अशा महिला- पुरुष महाराष्ट्र सैनिकांनी, हितचिंतकांनी आपलं नाव, संपूर्ण पत्ता, अतिरिक्त माहिती पुढील गूगल लिंकवर https://forms.gle/hbzpeEPYXYm6Pvf66 बटन दाबून भरावी. पक्षाकडून संबंधितांशी संपर्क साधला जाईल आणि निवड झालेल्या व्यक्तींना योग्य ती संघटनात्मक जबाबदारी देण्यात येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: