PMP कोथरूड आगाराच्या वतीने डॉ. राजेंद्र जगताप व शंकर पवार यांचा सत्कार

पुणे, दि. ४ – पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणेसाठी संचालक मंडळाची मान्यता घेतल्याबद्दल तसेच वाहतूक व वर्कशॉप विभागातील ४८१ कामगारांना बढती देऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला बढतीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल व १२१४ बदली कामगारांना कायम केल्याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व संचालक शंकर पवार यांचा सत्कार कोथरूड आगारात सर्व कामगारांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी नगरसेविका अल्पना वरपे,नगरसेविका वासंती जाधव, अजय मारणे, नितिन शिंदे, पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम, आगार अभियंता विलास मते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, कोरोनाकाळात जवळपास शून्यावर गेलेले दैनंदिन उत्पन्न गेल्या सहा महिन्यांत १ कोटी २५ लाखापर्यंत तर प्रवाशी संख्या साडेसात लाखापर्यंत पोहोचली आहे. तसेच सोलर रुफ टॉपच्या सहाय्याने सौरऊर्जा निर्मिती करून ई बस चार्जिंगसाठी सौरऊर्जेचा वापर करणार आहे. यामुळे वीजबिल खर्चात मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे सौरऊर्जेसाठी जी शेड उभारली जातील त्या शेडमध्ये कामगार दिवसभर सावलीत काम करतील व रात्रीच्या वेळी या शेडमध्ये बसेस पार्क करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.

शंकर पवार म्हणाले, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप कामगार हिताचे सर्व प्रश्न मार्गी लावत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पीएमपीएमएलची धुरा हातात घेऊन नाविन्यपूर्ण योजना राबवून महामंडळाचे उत्पन्न त्यांनी वाढविले आहे. तसेच कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवून कामगारांना न्याय दिला आहे.

कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉप विभागातील कामगारांनी विशेष परिश्रम घेऊन गेल्या अडीच वर्षांपासून बंद असणारी सीएनजी बस क्रमांक २५२ सुरू केली. स्क्रॅप झालेल्या बसेसचे मटेरिअल वापरून ही बस पुन्हा सुरू केली आहे. या बसला डॉ. राजेंद्र जगताप व इतर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. २०१८ पासून बंद असलेल्या ७ बसेस डिसेंबर २०२० पासून मार्गावर आणल्याचे कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांनी सांगितले. सुनिल नलावडे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. अजय अनपूर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: