एचआयव्ही बाधीत महिलांना रेशन साहित्य आणि आरोग्य किटचे वाटप

पुणेः- जनसेवा फौंडेशन, पब्लिक हेल्प फौंडेशन आॅफ इंडिया अर्थात (पी.एच.एफ.आय) आणि जॉन पॉल स्मल डेव्हलपमेंट प्रकल्प यांच्या सहकार्याने बुधवार पेठ, मार्केट यार्ड, भोसरी, येरवडा आणि हडपसर या परिसरातील 188 एच.आय.व्ही. बाधित महिलांना गहू, ज्वारी, तांदुळ, डाळ आणि साखर अशा प्रत्येकी 20 किलोच्या पॅकचे रेशन कीट, मास्क, सॅनिटायझर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद शहा, प्रकल्प प्रमुख विश्वस्त मीना शहा आणि उद्योजक राजेश शहा यांच्या संकल्पनेतून ह्या प्रकल्पास प्रेरणा मिळाली आणि या प्रकल्पास अंतिम स्वरुप देण्यात आले.

येरवडा येथील मदर तेरेसा हॉल सभागृहात साहित्य वाटपाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात जनसेवा फौंडेशनचे जयदेव नाईक, एकता योगा ट्रस्टचे अध्यक्ष नाना निवंगुणे, नगरसेवक जाॅन पाॅल, घोडके पेढेवाले उद्योग समुहाचे नीलेश घोडके, महेंद्र पवार, भरत गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.एच.आय.व्ही. बाधित महिलांना सामाजिक घटकांनी योग्य ती मदत करावी, असे आवाहन नगरसेवक जॉन पॉल यांनी यावेळी केले.

साहित्य वाटपाच्या दुपारच्या दुस-या सत्रात हडपसर येथील बंटर स्कूल येथे हडपसर परिसरातील नागरिक प्राचार्य एस.बी. पाटील, उद्योजक जी.एस. लव्हे, उद्योजक श्यामराव काळे, फौंडेशनचे कार्यकारी संचालक विशाल पवार, घोडके पेढेवाले उद्योग समुहाचे नीलेश घोडके आणि शशांक पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रा. जे.पी. देसाई यांनी जनसेवा फौंडेशन, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा आणि प्रकल्प प्रमुख विश्वस्त मीना शहा यांच्या सेवा कार्याची माहिती दिली. याप्रसंगी देहविक्रय करणा-या महिलांना येणा-या समस्यांवर उहापोह करण्यात आला.

जनसेवा फौंडेशनचे विश्वस्त जयदेव नाईक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन एकता योगा ट्रस्टचे अध्यक्ष नाना निवंगुणे यांनी दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा फौंडेशनचे भरत गायकवाड, जॉन पॉल संस्थेचे कृष्णा गणेश आणि अर्चना वाघमारे यांनी केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: