कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात भारतीय कामगार सेनेचे आंदोलन  

वेर्णा (गोवा), दि. १६ – गेल्या अनेक वर्षांपासून काम करित असलेल्या बहुतांश कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकले, अनेक वर्षापासून पगारामध्ये होत असलेली तफावत, नोकरीची असुरक्षितता, कामादरम्यान केले जाणारे दबावतंत्र, सुविधांचा अभाव तसेच व्यवस्थापनाने निलंबन केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने गोव्यातील वेर्णायेथील तेवा फार्मा इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरु केले आहे.

आपल्यावर अन्याय करत असलेल्या कंपनीच्या निषेधार्थ  कामगारांनी यापुर्वी भारतीय सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची भेट घेतली होती. कंपनी कर्मचा-यांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला होता. अनेक अडचणींना तेथील कर्मचारी तोंड देत असल्याची व्यथा डॉ. कुचिक यांच्यासमोर कामगारांनी मांडली होती.

डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले की, तेवा फार्मा इंडिया प्रा. लिमिटेड, वेर्णा, गोवा कंपनीने घेतलेल्या विविध जाचक निर्णयांमुळे कामगारांची पिळवणूक सुरू आहे. याविरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले असून प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी व कामगारांना न्याय मिळवून द्यावा. भारतीय कामगार सेना कामगारांच्या न्यायहक्कांसाठी सदैव त्यांच्यासोबत आहे. याविषयामध्ये लक्ष देऊन त्वरित तोडगा काढण्याची मागणी मी गोवा सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या महामारीत कामगारांना कामावरून काढू नका असे राज्य व केंद्र शासनाचे आदेश असतानादेखील या आदेशांना केराची टोपली दाखवीत अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता या कामगारांना कामावरून काढल्यामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्मचार्‍यांची सुरू असलेली आर्थिक कुचंबना व त्यामुळे होणारे हाल अतिशय वेदनादायक आहेत. व्यवस्थापनाने निलंबन केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे अन्यथा कंपनीविरोधात अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या डॉ. कुचिक यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: