ललिता व डाॅ. श्रीपाल सबनीस यांनाराष्ट्रीय ‘सावित्रीजोती’ पुरस्कार जाहीर

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी (१० मार्च) होणाऱ्या समारंभामध्ये सबनीस दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. डाॅ. सबनीस यांनी ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, २० व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि इतरही महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. ललिता सबनीस यांच्या मनस्पंदन, पं. रमाबाई, सुखाच्या शोधात या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. डाॅ. सबनीस यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून सातत्याने परखडपणे व्यक्त केलेल्या सत्यशोधकी आणि पुरोगामी विचारांचा हा सन्मान आहे, असे रोकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: