आंतरराज्यीय रक्तदान शिबीरात ८०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे, दि. ७ – महाराष्ट्रासह काश्मिर, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील रक्तदात्यांनी आणि अमरावती, जळगाव,अहमदनगर, सांगली, क-हाड, सातारा, भोर इत्यादी ठिकाणांहून सुमारे ८०० रक्तदात्यांनी पुण्यात आयोजित आंतरराज्य रक्तदान शिबीरात रक्तदान केले. तब्बल १५ ते १६ रक्तपेढयांनी एकत्रितपणे या शिबीरात सहभाग घेतला होता. विविध शहरे, जिल्हा आणि राज्यांतील रक्तदात्यांनी पुण्यात येऊन रक्तदान करणे, हा आगळावेगळा रक्तदान महायज्ञ पुणेकरांनी अनुभविला. 

निमित्त होते, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ रक्तदाते राम बांगड यांच्या १४१ वेळा रक्तदानपूर्तीनिमित्त बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावरील महेश सांस्कृतिक भवन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिरालाल मालू, माहेश्वरी चॉरिटेबल फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष ईश्वरलाल धूत, भरत शहा, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत, डॉ.रामविलास मंत्री, डॉ.जयप्रकाश राठी, जवाहर बाहेती, ललित जैन, पुरुषोत्तम लोहिया, गिरीधर काळे, राम बांगड आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन राम बांगड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

हिरालाल मालू म्हणाले, रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे कोरोना काळात मोठया प्रमाणात समाजकार्य करण्यात आले. आज राम बांगड यांनी समाजासमोर रक्तदानाचा आदर्श घालून दिला आहे. यामुळे अनेक युवकांना देखील नियमीत रक्तदान करण्याकरीता प्रेरणा मिळणार आहे. रक्तदान क्षेत्रातील महर्षि म्हणून राम बांगड यांचा गौरव व्हायला हवा. 

राम बांगड म्हणाले, रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत १५ राज्ये आणि २२ जिल्हयात ५० हजार रक्तदाते यामाध्यमातून निर्माण झाले आहेत. मी नियमित रक्तदाता असून सन १९७६ पासून रक्तदान करीत आहेत. स्वत: रक्तदान करण्यासोबतच इतरांनी देखील रक्तदान करावे यासाठी मी जनजागृती करतो. कोविडमध्ये ९ वेळा मी प्लाझ्मादान केले असून आतापर्यंत २१ वेळा प्लेटलेटस डोनेशन केले आहे. ४०० हून अधिक कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पुण्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून शिबीरात संकलित होणार रक्त सर्व रक्तपेढयांना देण्यात येईल.
कार्यक्रमात विविध राज्यातील रक्तदात्यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांना सन्मानित करण्यात आले. अशोक राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: