fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

पुणे, दि.६ : उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
किवळे येथील सिम्बॉयोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा प्रथम पदवीदान समारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार, प्रभारी कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरु डॉ. अश्विनी कुमार शर्मा, फियाटचे अध्यक्ष रवी गोगिया, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, सिम्बॉयोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ हे राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. कौशल्य विकासासाठी विद्यापीठाची प्रतिबद्धता आणि येथे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचे त्यांनी कौतुक केले. कौशल्य आधारित शिक्षणात विद्यापीठ देशासाठी एक आदर्श आहे. सिम्बॉयोसिस विद्यापीठाने कौशल्य विकास केंद्र स्थापनेबाबत मार्गदर्शन करावे असे सांगून शैक्षणिक संस्थांनी उद्योगांशी अशा प्रकारे एकत्रित येवून रोजगार उपलब्धी वाढविणाऱ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले. अशाप्रकारे इतर संस्थानी सुध्दा रोजगार उपलब्धीबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. मुजुमदार म्हणाले, कौशल्याधिष्ठीत शिक्षणामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते. त्यामुळे या विद्यापीठात विद्यार्थांना कमी कालावधीत कौशल्याधिष्ठीत शिक्षण देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्रित मिळून त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


फियाटचे गोगिया यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सतत अध्ययन करत रहा. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. कामावर प्रेम करा. स्वतःवर विश्वास ठेवा. एकदा घेतलेला निर्णय बदलू नका. देशाचा नागरिक या नात्याने सामाजिक योगदान द्या, असे मार्गदर्शन केले.
प्रारंभी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी विद्यापीठाच्या कौशल्य केंद्राची पाहणी करत सुरु असलेल्या संशोधनाबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते विद्यार्थांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती मुजुमदार तर सूत्रसंचालन डॉ. दीपा करंदीकर यांनी केले. आभार डॉ. गौरी सिऊरकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading