२६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार एशिया इकोनॉमिक डायलॉग – २०२१

पुणे, दि. ४ – परराष्ट्र मंत्रालय व पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय एशिया इकोनॉमिक डायलॉग – २०२१ (एईडी २०२१) चे आयोजन करण्यात आले आहे. एईडीचे हे सलग पाचवे तर पीआयसी सोबतचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

‘पोस्ट कोविड १९ ग्लोबल ट्रेड अँड फायनान्स डायनॅमिक्स’ ही यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना असून अनेक देशांचे परराष्ट्र मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वित्त विषयक तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.      

चीन, पाकिस्तान आणि भूतान येथे भारतीय राजदूत म्हणून काम केलेले व पीआयसीचे विश्वस्त गौतम बंबावले हे या परिषदेचे समन्वयक असून यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, “मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने आम्ही तीन दिवसीय एशिया इकोनॉमिक डायलॉग – २०२१ या जिओइकोनॉमिक्स परिषदेचे आयोजन करीत आहोत. यामध्ये प्रामुख्याने कोविद १९ नंतर जागतिक अर्थव्यवस्था कशी सावरू शकेल, पुरवठा साखळ्यांचे पुन: संयोजन कसे करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात येणार आहे.”

सदर परिषद ही शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून सकाळी ११ वाजता परिषदेचे औपचारिक उद्घाटन होईल. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व इतर पराराष्ट्र मंत्री यामध्ये सहभागी होतील. फोर्ब्ज अॅण्ड मार्शलचे सह अध्यक्ष व पीआयसीचे विश्वस्त डॉ. नौशाद फोर्ब्ज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या वेळी ‘रेसिलिएन्ट ग्लोबल ग्रोथ इन ए पोस्ट पॅण्डामिक वर्ल्ड’ या विषयावर चर्चा होईल. यानंतर ‘ग्लोबल फायनान्स इन अ पोस्ट कोविड १९ वर्ल्ड’ या विषयावर चर्चा होईल. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (ब्रिक्स) माजी अध्यक्ष डॉ. के. व्ही. कामत हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.  

यानंतर शनिवार २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ‘बिल्डींग रिलायबल ग्लोबल सप्लाय चेन्स’ या विषयावर चर्चासत्र होईल. ५ एफ वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पीआयसीचे विश्वस्त डॉ. गणेश नटराजन हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. तर बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, व्हिएतनाममधील सोविको समूहाचे अध्यक्ष ग्वेन थान्ह हंग या चर्चेत सहभागी असतील.                    

परिषदेच्या चौथ्या सत्रात शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी सायं ४.३० वाजता ‘विदर डब्लूटीओ पोस्ट कोविड १९ पॅण्डामिक ?’ या विषयावर जागतिक व्यापार संघटनेचे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, जमैका व भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी सहभागी होतील. जागतिक व्यापार संघटनेचे भारतातील माजी राजदूत जे. एस. दीपक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली व सेंटर फॉर डब्लूटीओचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अभिजित दास हे देखील या वेळी सहभागी होतील.              

परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘पर्स्पेक्टीव्हज ऑन इंडियाज इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कोऑपरेशन’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये भूतानचे पराराष्ट्र मंत्री डॉ. तंडी दोर्जी, मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शहीद, मॉरीशसचे परराष्ट्र मंत्री नंदकुमार बोधा व वाणिज्य सचिव (इकोनॉमिक रिलेशन्स) राहुल छाब्रा हे सहभागी होतील. माजी परराष्ट्र सचिव आणि पीआयसीचे सदस्य विजय गोखले हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला आणि वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान हे रविवार २८ फेब्रुवारी सायं. ४. ३० वाजता ‘इंडिया अॅज अ ग्लोबल पार्टनर’ या विषयावर आपली मते व्यक्त करतील. हिंदुस्थान टाइम्सच्या फॉरेन एडिटर प्रमित पाल चौधरी या वरील चर्चासत्राच्या अध्यक्ष्स्थानी असतील.

सदर परिषद ही पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने होणार असून यु ट्यूबवर देखील तिचे थेट प्रसारण होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: