वाहनउद्योगाशी संबंधित स्टार्ट अप्सला चालना देण्यासाठी एआरएआय आणि अटल इनोव्हेशन मिशन यांमध्ये करार  

पुणे, दि.3 – वाहन संशोधन, चाचण्या व प्रमाणीकरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयने वाहनउद्योगाशी संबंधित स्टार्ट अप्स इकोसिस्टिमला (नवसंकल्पनांसाठीची आवश्यक परिसंस्था) चालना देण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन – नीती आयोग यांसोबत करार केला आहे. यासंदर्भातील एसओआय अर्थात स्टेटमेंट ऑफ इंटेन्टवर नुकत्याच स्वाक्ष-या देखील करण्यात आल्या.      

याबद्दल अधिक माहिती देताना एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई म्हणाले, “वाहन उद्योग व दळणवळण क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्सना मदत करण्यासाठी एआरएआयच्या वतीने ‘टेक्नोव्हस’ या ऑनलाईन व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत स्टार्ट अप्सना या क्षेत्रातील एआरएआयचा प्रदीर्घ अनुभव, कौशल्य आणि उपकरणे यांचा उपयोग करून घेता येणे शक्य होणार आहे. सुरुवातीच्या काळात अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत येणा-या स्टार्ट अप्सचा यात समावेश असणार आहे.”          

या दरम्यान स्टार्ट अप्सच्या संकल्पनांची उपयुक्तता व व्यावसायिकदृष्ट्या त्याची व्यवहार्यता यांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून याद्वारे स्टार्ट अप्स व उद्योगक्षेत्र यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे, बी २ बी संदर्भातील नवसंकल्पनावर काम करणे, तांत्रिक सल्ले आणि तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन करणे आदी बाबींवर काम करण्यात येईल, असेही डॉ. मथाई यांनी नमूद केले.    

स्टार्ट अप्स व लघु मध्यम व्यावसायिकांना प्रामुख्याने त्यांच्या प्रोटो टाईप प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी चाचण्या आणि प्रमाणीकरणासाठी लागणारे मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे दिले जाईल अशी माहिती एआरएआयचे उपसंचालक व कॉर्पोरेट प्लॅनिंग विभाग प्रमुख नितीन धांडे यांनी दिली.      

या संदर्भात अधिक माहिती देताना अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रामाणन म्हणाले, “देशाच्या वाहनउद्योग क्षेत्रात योगदान असलेल्या एआरएआय सारख्या संस्थेसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्साही असून याचा आम्हाला आनंद आहे. नवसंकल्पनांना संपूर्ण देशभरात एक परिसंस्था निर्माण करण्यासोबतच येणा-या समस्या सोडविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करणे हा आमचा उद्देश आहे. याशिवाय शहरांबरोबरच खेड्यांमध्ये देखील दळणवळण, विद्युत दळणवळण (इलेक्ट्रिक मोबिलिटी), वाहतूक, शाश्वत विकास व डिजिटल पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे हे आमचे उद्दीष्ट असेल.                    

या करारासंदर्भात अधिक माहिती देताना एआरएआयच्या जनरल मॅनेजर व उपक्रमाच्या समन्वयिका उज्ज्वला कार्ले म्हणाल्या की, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस (एएनआयसी) अंतर्गत रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व समस्या यांवर आम्ही काम करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्‍या उपयुक्त रस्ते सुरक्षा, दळणवळण व वाहनासाठी आवश्यक सुटे भाग यांच्याशी निगडीत नवसंकल्पनांचा समावेश असेल.

पहिल्या टप्प्यात १५ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत स्टार्ट अप्सना  aim@technovuus.araiindia.com या मेल आयडी वर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: