भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणी प्रकरणात पोलिसांकडून चौकशी

मुंबई -भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरे सरकारला अंगावर घेणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत. कारण किरीट सोमय्या यांचे सुपुत्र आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांच्याविरुद्ध खंडणीचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

एका जुन्या प्रकरणात नील सोमय्या यांना मुलुंड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. नील यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. तब्बल 4 तास चौकशी झाल्यानंतर नील सोमय्या हे घरी परतले. मात्र आगामी काळातही याच प्रकरणावरून नील सोमय्या यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्या यांची राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या हे घणाघाती आरोपांसाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर असो की थेट ठाकरे कुटुंबावर सोमय्या यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मनी लॉन्ड्रिंग, भुखंडावरील ताबा असे आरोप करत किरीट सोमय्या यांनी अनेकदा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता किरीट सोमय्या यांच्या मुलाचीच खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात चौकशी सुरू झाल्याने ते बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत अद्याप किरीट सोमय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पोलिसांकडून मुलाच्या होत असलेल्या चौकशीवरून ते सरकारविरोधात पुन्हा आक्रमक होतील अशी चिन्ह आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

Leave a Reply

%d bloggers like this: