‘तुळशीबाग राममंदिरा’ कडून अयोध्येतील राममंदिरासाठी ११ लाखांचा निधी

पुणे. दि. २९ – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वच स्तरातून आर्थिक योगदान दिले जात आहे. पुण्यातील पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरातर्फे ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे तुळशीबाग राममंदिरात आयोजित कार्यक्रमाला पेशव्यांचे वंशज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी व स्थानिक नगरसेवक आवर्जून उपस्थित होते. 


श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे यांच्याकडे हा निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प.शिवाजीमहाराज मोरे, रा.स्व.संघाचे प्रशांत यादव, अ‍ॅड.शरद चंद्रचूड, नगरसेवक हेमंत रासने, अ‍ॅड.गायत्री खडके, तुळशीबाग मंदिराचे विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीरामांची आरती देखील करण्यात आली. 


उदयसिंह पेशवे म्हणाले, नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून तुळशीबागवाले यांचे पुण्याच्या विविध विकासकामांमध्ये योगदान आहे. अयोध्येतील राममंदिरासाठी दिलेली देणगी ही स्प्रूहणीय गोष्ट आहे. आजच्या काळात मंदिरे सांभाळणे कठीण झाले आहे. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार व्हायला हवा. निधीअभावी मंदिरे पडत आहेत. त्यामुळे पुण्यातील अशा मंदिरांकडे देखील सर्वांनी लक्ष द्यायला हवे. 


ह.भ.प.शिवाजीमहाराज मोरे म्हणाले, प्रभू श्रीरामांचे चरित्र व अवतारकार्य भारतीयांसाठी आदर्श, अनुकरणीय व वंदनीय आहे. भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हाच मंदिरांचे पुर्नर्निमाण व्हायला हवे होते. पण त्यावेळच्या प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे हे झाले नाही. त्यामुळे आता राममंदिर ते राष्ट्रमंदिर अशी वाटचाल आपल्याला करायची आहे. त्याकरीता तुळशीबाग राममंदिर सारख्या संस्थांनांसोबतच सामान्यांचा सहभागही महत्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रशांत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी स्वागत केले. किशोर येनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: