शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास

पुणे : फळ, भाज्यांवर साकारलेले ओम् चे विलोभनीय नक्षीकाम… पक्षी व प्राण्यांच्या सुरेख प्रतिकृती फळे व भाज्यांवर साकारुन दत्तमहाराजांसमोर केलेली आकर्षक आरास आणि टोमॅटो, बटाटे, कणीस, पालक, गाजर आणि मटारने सजविलेले मंदिर पाहण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. द्राक्ष, डाळींब, संत्र्यासारख्या फळांचे साकारलेले तोरण आणि फळ-भाज्यांवर केलेली नक्षीदार सुरेख आरास आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह अनेकांना झाला.


शाकंभरी पौर्णिमा व गुरुपुष्यांमृत निमित्त बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरामध्ये ५१ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अली दारुवाला, पुणे शहर ज्यू समाज अध्यक्ष डॉ.डॅनियल पेणकर, एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, ज्येष्ठ विश्वस्त अंकुश काकडे उपस्थित होते. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी मंदिरातील आरास केली. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती अ‍ॅड. संजय व स्वाती काळे यांच्या हस्ते दत्तयाग झाला. ऊस लावून मंदिराच्या खांबांवर देखील सजावट करण्यात आली.


अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली. 
मंदिराच्या मुख्य गाभा-यातील मखर आणि त्यापुढील भागात ही आरास करण्यात आली आहे. फळ-भाज्यांमध्ये नक्षीकामाने साकारलेले विविध प्राणी-पक्षी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली.

Leave a Reply

%d bloggers like this: