fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNE

पुणे शहर मायेचा आधार ठरावे – शेखर गायकवाड

कर्जत तालुका मित्र मंडळाचा चौथा स्थापना दिन साजरा

पुणे, दि. २७ – कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागातून येणाऱ्या गरजू व होतकरू युवकांसाठी पुणे शहर आणि पुण्यातील कर्जत मित्र मंडळ मायेचा आधार ठरावा अशा सदिच्छा महाराष्ट्र राज्य राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या.

प्रजासत्ताक दिनी पुण्यातील साखर संकुल येथे कर्जत तालुका मित्र मंडळाचा चौथा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गायकवाड बोलत होते. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय तावरे, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ , महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे सहसचिव संपतराव सूर्यवंशी, पुणे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले, साखर उपायुक्त पांडुरंग शेळके, पुणे जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व कर्जत मित्रमंडळ पुणे चे संस्थापक अध्यक्ष संभाजी लांगोरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

शेखर गायकवाड आणि हेमंत धुमाळ यांनी ‘कोरोना किलर ‘ मशीन च्या संशोधनाबद्दल भाऊसाहेब जंजिरे यांचा भाषणात गौरव केला .

शेखर गायकवाड पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका पूर्वीपासून मागास व विकासाचा अनुशेष शिल्लक असलेला तालुका आहे. पाण्याचे दुर्भिक्ष ही येथील कायम समस्या आहे. त्यामुळे नोकरी, उद्योग, रोजगाराच्या शोधात पुण्यासारख्या महानगरात आलेल्या कर्जतकरांनी मित्र मंडळाची स्थापना करून आपल्या गावाकडील मातीशी आणि माणसाशी ईमान राखला आहे. तालुक्‍यातील मुलांसाठी भविष्यात पुण्यासारख्या महानगरात निवास व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी कर्जतकरांना केले .

शाळा आणि महाविद्यालयातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची नोंद ठेवून अधिकाधिक गरजू व गरीब मुलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहनही गायकवाड यांनी याप्रसंगी केले.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, जामखेड हे तालुके कायम विकासाच्या बाबतीत मागे राहिले आहेत. या तालुक्यात अलीकडे होत जाणारे बदल निश्चित समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे असून यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जावेत आणि त्याचा लाभ गावाकडून शहरात येणार्‍या गरजूंना होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी याप्रसंगी कर्जत मित्र मंडळाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जलिंदर सुपेकर यांनी कर्जत मित्र मंडळाच्या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम राबवले जाणार असून मित्रमंडळ करत असलेल्या कामाचे कौतुक केले. पुणे शहरात स्थायिक झालेल्या सर्व कर्जतकरांनी आपापल्या पद्धतीने योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदीप सांगळे यांची प्राध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल, बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय व्यवस्थापकपदी निवड झालेले देवदत्त रोकडे हवेली कृषी अधिकारीपदी नियुक्त झालेले गणेश धस आणि कर्जत मित्रमंडळाच्या वेबसाईट निर्मितीचे काम करणारे रवींद्र कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

प्रा.डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल सोनवणे व मसउद शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading