‘सुबोधवाणी’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दालन- एअर मार्शल (निवृत्त)भूषण गोखले

पुणे, दि. २७ – “विद्यार्थ्यांतील कल्पक, सर्जनशील वृत्तीला प्रोत्साहन देण्याची गरज असते. ‘मएसो सुबोधवाणी’ या वेब रेडिओ केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी नवनवी दालने खुली होतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.

७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेल्या या ‘सुबोधवाणी’ रेडिओ केंद्राचे उद्घाटन गोखले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशातील मराठी माध्यमाच्या शाळेतील हा पहिला आणि एकमेव वेब रेडिओ आहे. याप्रसंगी उद्योजक विश्वास काळे, ‘सुबोधवाणी’चे संकल्पक विलास रबडे, विज्ञान भारतीचे अध्यक्ष  आर. व्ही. कुलकर्णी, सदस्य रमेश हाते, श्रीकांत कुलकर्णी, श्रीमती नीला पुरोहित, प्रशालेच्या शाळा समिती अध्यक्षा आनंदी पाटील, सदस्य देवदत्त भिशीकर, सुधीर गाडे, अरविंद गायकवाड, श्रीधर करकरे यांच्यासह पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वतःचे रेडिओ केंद्र सुरू करणारी सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही देशातील एकमेव शाळा ठरली आहे. प्रसंगी प्रशालेचे १९७० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी डिजिटल क्लासरूम भेट दिली.

भूषण गोखले म्हणाले, “भारत आता महासत्ता म्हणून उदयास येत आहे. चीनबरोबरचे युद्ध असो की चायनीज करोना या सगळ्या आव्हानांना भारताने समर्थपणे तोंड दिले आहे. धोरणामुळे आर्थिक परिस्थिती व परिणाम झाला. परंतु या सगळ्यातून आपला भारत देश पुढे चालला आहे. विविधतेतही एकता देशाने दाखवली आहे. सुबोध पुरोहित यांचे शौर्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.”

‘सुबोधवाणी’च्या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सुधीर गाडे यांनी केले. ते म्हणाले, “या संधीमुळे कल्पक, सृजनशील विद्यार्थी-विद्यार्थिनी घडविण्यासाठी याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक नवे दालन उपलब्ध झाले आहे. आनंदी पाटील यांनी स्वागत केले. विश्वास काळे यांनी कमोडर सुबोध पुरोहित यांचा जीवन परिचय सांगितला. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले, सुबोधवाणीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास, तसेच विज्ञान प्रसारास मदत होईल.

विलास रबडे यांनी सुबोध पुरोहित यांच्या आठवणी सांगितल्या. ‘प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती काही देणे लागतो या भावनेतून मित्रांशी संपर्क केला. अरविंद परांजपे, रवींद्र गोडबोले यांनी सहकार्य केले. श्रीपाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रेडीओ कसा सुरु करावा, याचे मार्गदर्शन घेतले. सुबोधवाणीमुळे विद्यार्थी स्वतःला घडवतील. सूत्रसंचालन अर्चना लडकत व विद्या गायकवाड यांनी केले. आभार प्रशालेचे मुख्याध्यापक रामदास अभंग यांनी मानले.

कमोडोर सुबोध पुरोहित स्मृतीप्रीत्यर्थ ‘मएसो सुबोधवाणी’
सुबोध वासुदेव पुरोहित हे विमलाबाई गरवारे प्रशालेचे विद्यार्थी होते. लहानपणापासूनच सर्व विषयात निपून, उत्साही असलेले सुबोध मेकॅनिकल इंजिनिअर होऊन पुढे भारतीय नौदलामध्ये दाखल झाले. १९६९ ते २००४ अशी ३५ वर्षे त्यांनी नौदलात सेवा केली. एक उत्कृष्ट पायलट म्हणून त्यांची ख्याती होती. सुबोध पुरोहित ‘व्हीव्हीआयपी’ भेटीसाठी कोची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आले. यावेळी अचानक विमान अनियंत्रित झाले. तरीदेखील कमोडोर सुबोध यांनी विमान समुद्रात बुडण्याआधी दोनशे फुटापर्यंत खाली आणले. सात तास नेतृत्वगुणांची आणि प्रसंगावधान व संयमाची परिक्षा देत विमान व इतरांचे प्राण वाचवले. त्यासाठी १९८१ साली यांना शौर्य पदकाने गौरवण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: