पीएमपी – डेक्कन ते सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय लवळे बससेवा सुरू

पुणे, दि. २७ – पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलने डेक्कन ते सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय लवळे मार्ग क्र. ८७ अ अशी बससेवा दि. २७ जानेवारी २०२१ पासून सुरू केली. सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार , पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप , पीएमपीचे संचालक शंकर पवार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचे उदघाटन  करण्यात आले.


सिंबायोसिस विद्यापीठाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने दिनांक १ जानेवारी २०२१ पासून सिंबायोसिस रुग्णालयात शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सर्व प्रकारचे उपचार व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केलेल्या आहेत.सध्या या रुग्णालयात दररोज किमान १००० रुग्ण ओपीडीमध्ये येतात व अॅडमिट होणार्‍या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे.मात्र या रुग्णालयात पोहोचण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापपर्यंत नव्हती. परंतु आता पीएमपीएमएलने ही बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशी नागरिकांची सिंबायोसिस रुग्णालयात जाण्या येण्याची चांगली सोय होणार आहे. सिंबायोसिसचे सी. ई. ओ. डॉ. विजय नटराजन यांनी स्वागत केले. सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, गोरगरिबांना महागड्या खाजगी रुग्णालयांमध्ये मध्ये उपचार घेणे परवडत नाही. मात्र सिंबायोसिस रुग्णालयामध्ये सर्वोत्तम उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. पीएमपीएमएलच्या बससेवेमुळे आता गरीब रुग्णांना सिंबायोसिस  मध्ये येणे जाणे सोईचे होणार आहे.
डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, मार्ग क्रमांक ८७ हा अस्तित्वात असलेला मार्ग लवळे गावाच्या सिंबायोसिस कॅम्पस पर्यंत आणून प्रवाशी नागरिकांची सोय केली आहे. ही बससेवा पुणे शहरातील महत्वाच्या केंद्रांना जोडून पाच रुपयात पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा व ग्रामीण भागात सुरू केलेले इतर नवीन मार्ग या सेवांचाही लाभ प्रवाशांना घेता येईल. प्रवाशांच्या सोयीनुसार बससेवा देणे हे आमचे कर्तव्यच आहे.
सोनाली राठोड यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास मुळशी तालुक्याचे उपसभापती विजय केदारी, पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक संचलन व नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, लवळे गावचे सरपंच विजय सातव, सुसगावच्या उपसरपंच सौ. दिशा ससार, सतिश मोहोळ, उपेंद्र खाडिलकर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: