लष्कर व उपकरण उद्योजक यांच्यात परस्पर विश्वासार्हता असणे अत्यंत आवश्यक – सुदर्शन हसबनीस

पुणे, दि. २४ – “लष्कर व  ‘एमएसएमईज’ उद्योजक यांच्यातील विश्वासार्हतेचा प्रश्न मोठा आहे. लष्कर मागणीदार आहे. तर उद्योजक पुरवठादार. त्यांच्यात परस्पर विश्वासार्हता असेल तरच त्यांच्यात सुदृढ नाते निर्माण होऊ शकते. भारतीय लष्कराला शिकविले जाते की प्रत्येक जवानाशी एक आपलेपणाचे नाते निर्माण करा तरच ते एक होऊन सीमेवर लढू शकतील, देशाचे रक्षण करू शकतील. परंतु विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्याचप्रकारे उद्योजकांनी आणि सैन्याने धैर्याने एकमेकांना वेळ देऊन विश्वास वाढव्हायला हवा.” असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी व्यक्त केले.

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे माजी विद्यार्थी व सहकारी तसेच ‘स्पेशल पर्पज ग्रुप- लाइव्हलीहूड, इम्प्लोयमेंट’ (एसपीजी- एलई) यांच्या वतीने ‘डायलॉग (संवाद) विथ एमएसएमईज (MSMEs) मॅन्युफॅक्चारिंग फॉर द इंडियन डिफेन्स सेक्टर : चॅलेंजेेस, ओपोर्च्युनिटी अँड वे अहेड’ (भारतीय लष्कर क्षेत्रासाठी उत्पादन करणाऱ्या अतिलघू, लघु व मध्यम उद्योजकांशी संवाद : आव्हाने, संधी व भविष्य) या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी सुदर्शन हसबनीस बोलत होते. यावेळी डेमा (DEMA)चे अध्यक्ष व पद्मश्री इलेक्ट्रोनिक्सचे संचालक शिरीष देशमुख, ‘एमसीसीआयए’च्या डिफेन्स व इलेक्ट्रोनिक्स विभागाचे संचालक प्रशांत जोगळेकर, प्रचारक उद्योजक व वेव्हलेट टेक्नोलॉजीज प्रा. लि. चे डॉ. संचालक विश्वास उडपीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हसबनीस म्हणाले, “प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते. ती लष्कराला पूर्ण करावीच लागते. लष्कर देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असल्याने एक साधी चुकही आपल्याला घातक ठरू शकते, याचे भान ठेउनच त्यांना निर्णय घ्यावे लागतात; त्यामुळे या प्रक्रियेत वेळ जातो. लष्कराने एकाद्या उपकरणाची मागणी केल्यावर त्यांना त्याची लवकरात लवकर आवश्यकता असते. त्यामुळे उत्पादकांनी मागितलेल्या वेळेत जर ते काम पूर्ण केले तर त्यांच्याविषयी लष्करालाही विश्वास वाटतो. यासाठी उद्योजकांनी लष्कराची धोरणे काय आहेत, त्यांचा कसा वापर करावा हे समजून घेत काम केले तर याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. परंतु याविषयीची जागरूकता त्यांच्यात येणे फार आवश्यक आहे. उद्योजकांनी सैन्यदलांशी योग्य यंत्रणे मार्फत सम्पर्कसेतु तयार करुन संवाद साधत समस्या सोडवून घेणेदेखील गरजेचे आहे.”

यावेळी देशमुख यांनी उद्योजकांच्या समस्यांना अधोरेखित करत सांगितले की, “भारतीय उपकरणे ही परदेशी उपकरणांच्या तुलनेत अधिक सक्षम असली तरी केवळ त्याची किंमत तुलनेने अत्यंत कमी असल्याने त्याच्या दर्जावर संशय घेत नाकारले जाते व महागड्या परदेशी उपकरणांना पसंती दिली जाते. यामुळे एमएसएमईज उद्योजकांमध्ये एकप्रकारची नाराजी आहे. खरे पाहता हे उद्योजक सहज उपलब्ध असल्याने काही समस्या आल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे या अहवालाचा सरकारी स्तरावर गांभीर्याने विचार केला जाईल अशी आशा आहे.”

जोगळेकर म्हणाले, “या अहवालातील समस्यांची मांडणी नक्कीच खरी आहे. मराठा चेंबरने  केलेल्या निरीक्षणात सुद्धा उद्योजकांच्या अनेक समस्या सामोरे आल्या आहेत उदा.  ऑर्डर रद्द होणे, अपूर्ण ऑर्डर, परतावा प्रलंबित होणे आदि  समस्या आहेत. त्यांचे उपायही येथे विस्तृतपणे सांगितले गेले आहेत. मात्र महत्वाचा मुद्दा हा आहे की, योजना, निधी या विषयीची जागरूकता उद्योजकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे.
 त्यासंदर्भातील कार्यक्रम आम्ही नजीकच्या भाविष्यात राबविणार आहोत.”

उडपीकर म्हणाले, “व्यवहाराचे पैसे मिळण्याला दीर्घ काळ लागतो, हा मुद्दा खरा आहे. यावर उपाय म्हणून लष्कराने त्या उद्योजकाला बौद्धिक मालमत्ता अधिकाराने भागीदार करून घ्यायला हवे. म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळायला अंदाजे १० वर्षाचा कालावधी लागणार असेल तर किमान त्या उत्पादकाला त्या उपकरण निर्मितीसाठी प्रसिद्धी किंवा अन्य कोणत्या प्रकारची पोचपावती मिळावी. यातून त्यांच्यात एकप्रकारचे नाते निर्माण होईल, आपल्या उत्पादनाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता निर्माण होईल. ज्याचा फायदा लष्कर व उद्योजक दोघांनाही होईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: