सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने अभ्यास केंद्र – उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांचे सत्यशोधक विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संवाद पुणेच्या व्यासपीठावरून केली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात मंत्री सामंत यांनी आज) हजेरी लावली. सुरुवातीला त्यांनी बालगंधर्व कलादालनातील छायाचित्र-व्यंगचित्र तसेच प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या साहित्यसंपदेची पाहणी केली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात प्रबोधनकार ठाकरे यांचे सत्यशोधक विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे विद्यापीठात अभ्यास केंद्र आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनकारांविषयी माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात प्रबोधनकारांवर धडा समाविष्ट करावा अशी मागणी केली. विद्यापीठात अभ्यास केंद्र सुरू करण्याच्या मागणीस सामंत यांनी तात्काळ मान्यता देत या संदर्भात कुलगुरूंशी आज चर्चा झाली असून अभ्यासकेेंद्रासाठी समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होण्यासाठी संवाद पुणेने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीत अशा प्रकारचा महोत्सव सुरू करण्याची जबाबदारी मी घेतो. प्रबोधन महोत्सव महाराष्ट्रातील किमान दहा मोठ्या शहरांमध्ये व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रबोधनकारांचे विचार संपूर्ण देशात पोहोचावेत, दिल्लीतही कार्यक्रम व्हावा या सुनील महाजन यांनी केलेल्या अपेक्षेचा धागा पकडून सामंत म्हणाले, प्रबोधनकारांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत त्यांचे विचार देशपातळीवर घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करू. स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत संकुल उभारण्याची कल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रबोधनकारांनी समतेचा विचार दिला. या विचारातूनच आपले कामकाज सुरू आहे. पुण्याची ओळख शैक्षणिक पंढरी अशी आहे. प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी पुण्यातही लवकरच टिचर्स अकॅडमी सुरू करण्यात येणार असून याची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात सुरू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थी-प्राध्यापक यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले. स्वागत सुनील महाजन, निकिता मोघे, हरिश केंची, किरण साळी यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: